संचित : स्वर लावण्य

>>दिलीप जोशी

लावणीचा ठसका म्हणजे सुलोचना चव्हाण. स्वरांची सिद्धी जन्मजात प्राप्त झालेल्या माईंनी जवळपास ऐंशी वर्षे गाणं हे जीवन मानलं. आपल्यासाठी त्यांनी ठेवलेला लावणीच्या लावण्याचा स्वरमय ठेवा अजरामर आहे.

लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण म्हटलं की त्यांची लहानपणापासून ऐकलेली अनेक अवीट गोडीची ठसकेबाज गाणी आठवतात. आमच्या राजावाडीतल्या गणेशोत्सवात झालेला त्यांचा कार्यक्रम, 2002 मध्ये त्यांच्या कार्यक्रमाचं केलेलं निवेदन, त्यांच्या गिरगावातल्या घरी सुलोचनाताई आणि त्यांचे पती यांच्याशी झालेल्या मनमोकळय़ा गप्पा सारंच आठवतं. लावणीचा ठसका म्हणजे सुलोचना चव्हाण हे समीकरण रुजण्याआधीपासून त्या गात होत्या. साधारण लता-आशा यांच्याच वयोगटातल्या माईंची गान-कारकीर्दही 1948 च्या सुमाराला सुरू झाली. त्यांचा जन्म 13 मार्च 1933 चा. बालपणापासूनच त्यांना गाण्याची आणि केवळ गाण्याचीच आवड होती. त्यांचं माहेरचं नाव सुलोचना कदम. या नावाने त्या आता ज्याला ‘बॉलीवूड’ म्हटलं जातं त्या हिंदी सिनेसृष्टीतल्या प्रसिद्ध गायिका होत्या. त्यांच्या हिंदी चित्रपटगीतांची अलीकडच्या पिढीला कितीशी माहिती आहे ठाऊक नाही. ‘मलिका’ चित्रपटातलं मधुबालावर चित्रित झालेलं ‘वो आये है दिल को करार आ गया है’ हे गाणं गाजलं. व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘सुरंग’ या चित्रपटासाठी सुलोचना कदम यांनी गायिलेलं गाणं होतं ‘ये दुनिया मुसाफिरखाना है.’ महंमद रफी यांच्यासह सुलोचनाताईंचं एक गाणं ‘ममता’ चित्रपटातलं. गाण्याचे बोल होते, ‘तेरा मेरा तेरा प्यार क्या है.’ असे कितीतरी हिंदी चित्रपट सुलोचना कदम (चव्हाण) यांच्या गीतांनी सजले. याशिवाय ‘उल्फत जिसे कहते है, जीने का सहारा है (काले बादल), निले से दुपट्टे पे ये पिली पिली साडीयां (मुखडा), ‘मन से मन की तार मिला ले’ (देवयानी), ‘लिखी है दो दिलो के किस्मत मे ये कहानी’ (भूल), ‘सावन भादों के बदरवा गये -आये रे’ (संदेश). ही यादी खूप मोठी होईल.

सुलोचना चव्हाण यांच्या या गाण्यांचे फार कार्यक्रम झाल्याचं ऐकिवात नाही. त्यांनी मराठी चित्रपटांसाठी इतक्या लावण्या गायिल्या की लावणी म्हणजेच सुलोचना चव्हाण असं रसिकांच्याही मनात पक्क ठसलं. ती गाणी रसिकांच्या मनात कायमची रुजली आहेत. ‘फड सांभाळ तुऱयाला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा’ (गीत – माडगूळकर, संगीत वसंत पवार, चित्रपट मल्हारी मार्तंड), ‘पाडाला पिकलाय आंबा’ (गीत – संगीत : तुकाराम शिंदे), ‘पदरावती जरतारीचा मोर नाचरा हवा’ (गीत – माडगूळकर, सं. वसंत पवार, चित्रपट मल्हारी मार्तंड), ‘मला हो म्हणतात लवंगी मिरची’ (गीत – खेबुडकर, सं. वसंत पवार, चित्रपट ‘रंगल्या रात्री अशा’) ‘सोळावं वरीस धोक्याचं’ (गीत – खेबुडकर, सं. वसंत पवार, चित्रपट ‘सवाल माझा ऐका’), अशा अनेक लोकप्रिय लावण्यांप्रमाणेच ‘सख्या हरी जडली प्रीत तुझ्यावरी’ असं भाव-भक्ती गीत (गीतकार – सूर्यकांत खांडेकर, संगीत – वसंत प्रभू) पिंवा ‘स्वर्गाहूनही प्रिय आम्हाला, अमुचा सुंदर भारत देश (गीत – शांता शेळके, सं. आदिल अहमद, चित्रपट – स्वप्न तेच लोचनी) अशी वेगळय़ा आशयाची गाणीही त्यांनी अप्रतिम गायिली.

2002 मध्ये ‘चित्रलेखा’तर्फे एका कार्यक्रमात मी, शाहीर साबळे आणि सुलोचना चव्हाण यांची छोटीशी मुलाखत घ्यावी आणि कार्यक्रमाचं निवेदन करावं असं ज्ञानेश महाराव यांनी सुचवलं. ही दुर्मिळ संधी होती. या दोन दिग्गज कलाकारांच्या घरी जाऊन आधी कार्यक्रमाबाबत चर्चा केली आणि आधी वयाची ऐंशी वर्षे उलटलेले शाहीर आणि नंतर सत्तरी उलटलेल्या सुलोचनाताई असं कार्यक्रमाचं स्वरूप होतं. सुलोचना चव्हाण यांच्या कार्यक्रमाच्या आरंभी मी म्हटलं, ‘माईंच्या आवाजाचं वय आजही सोळाच आहे… आता त्या सादर करतील सोळावं वरीस धोक्याचं…’ कार्यक्रम खूप रंगला. त्यानिमित्ताने दोन-तीन दिवस आधी त्यांच्या मुंबईतल्या गिरगावातील घरी गेलो. त्या दिवशी खूप थंडी होती. मी पोचलो तेव्हा माई चपात्या करत बसल्या होत्या. मी श्री. चव्हाणांशी गप्पा मारत होतो. थोडक्या वेळाने त्या शाल पांघरून बाहेर येत म्हणाल्या, ‘यंदा काय मुंबईत बर्फ बिर्फ पडतं की काय..!’ वातावरणात लगेच मोकळेपणा आला. मी त्यांना संत गाडगेबाबांच्या आवाजातील कीर्तनाची पॅसेट दिली. तेव्हा माईंना गाडगेबाबा गिरगावात आले होते तो प्रसंग आठवला.

‘अगदी शांतपणे, चेहऱयावरचे भाव न बदलता तुम्ही लावणीतला तुमचा प्रसिद्ध ‘ठसका’ कसा आणता?’ या प्रश्नावर त्या हसून म्हणाल्या, ‘अहो मला नजरेसमोर नृत्यांगनेची अदाकारी दिसायला लागते आणि मी गीते. इतक्या तन्मयतेने ‘लावणी’त रंगलेली ही ज्येष्ठ-श्रेष्ठ गायिका. स्वरांची सिद्धी जन्मजात प्राप्त झालेल्या माईंनी जवळपास ऐंशी वर्षे गाणं हे जीवन मानलं. त्या वयाच्या सहाव्या वर्षापासून गात होत्या. अखेरच्या काळात त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्कार लाभला. आता ते कृतार्थ जीवन निमालं, पण आपल्यासाठी त्यांनी ठेवलेला लावणीच्या लावण्याचा स्वरमय ठेवा अजरामर आहे.

[email protected]