एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य परिवहन मार्ग मंडळाची पहिली एसटी बस नगरच्या माळीवाडा भागातून पुण्यापर्यंत 1 जून 1948 रोजी धावली होती. त्या बसचे पहिले वाहक लक्ष्मण केवटे (वय 99) यांचे बुधवारी रात्री 8.45 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

लक्ष्मण केवटे मनमिळावू स्वभावाचे होते. आपण नोकरी करावी, असे त्यांना वाटत होते. त्या इच्छेनेच ते एसटी महामंडळामध्ये रुजू झाले आणि त्यांना वाहक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ग्रामीण भागातील मुले शिकली पाहिजेत, या उद्देशाने त्यांनी विशेष प्रयत्न केले.

नागरिकांनी केले बसचे पूजन
नगर-पुणे एसटी बसचे पहिले चालक किसन राऊत आणि वाहक होते लक्ष्मण केवटे, हे दोघेही नगर जिह्यातीलच होते. लक्ष्मण केवटे ज्यावेळी महामंडळात भरती झाले तेव्हा त्यांना 80 रुपये पगार मिळत होता. नगर ते पुणे या अंतरासाठी पहिल्या बसचं भाडं हे अडीच रुपये होते. साधारणपणे नगर ते पुणे हे अंतर सव्वाशे किलोमीटर होते. बसस्थानकातून बाहेर पडल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला लोक उभे होते. नागरिकांनी बसचे पूजन केले होते.