पाचूचा पक्षी

612

>> विद्या कुलकर्णी

पर्णपक्षी. पानांच्या गर्द हिरवाईत तो बेमालूम मिसळतो. ही गच्च झाडीच त्याची ओळख.

निसर्गामध्ये हिरव्या रंगाच्या अनेक छटा बघावयास मिळतात तसेच अनेक पक्ष्यांमध्ये हिरवा रंग प्रामुख्याने असतो, परंतु पर्णपक्ष्यांचा हिरवा रंग काही वेगळाच आहे. तो पानांच्या रंगात पूर्णतः मिसळून जाऊन फोटोग्राफर्सची परीक्षाच घेतो!!
पर्णपक्षी हिंदुस्थानी उपमहाद्वीप आणि दक्षिण पूर्व आशिया येथे आढळतात. त्यांचे वास्तव्य समुद्रसपाटीपासून सुमारे 2000 मी. उंची पर्यंत झाडाझुडपांमध्ये, शेती जवळच्या दाट झाडांमध्ये, सदाहरित जंगलांत, पानगळीच्या मान्सून जंगलात असते.
पर्णपक्षी मोनोजनेरिक कुटुंबातील आहेत. या पक्ष्यांची लांबी 14 ते 21 सें.मी. असून वजन 15 ते 48 ग्रॅम्स असते. या पक्ष्यांचा प्रामुख्याने हिरवा रंग असून पिसारा चमकदार असतो. नरापेक्षा मादीचे रंग फिके असतात व किशोरवयीन पक्ष्याचे त्याहीपेक्षा हलक्या रंगाचे असतात. या पक्ष्यांचे पंख नाजूक असल्यामुळे हाताळले गेले तर झडून जातात.
किडे, कीटक, फळे व फुलांमधील मधुरस हे पर्णपक्ष्यांचे खाद्य असते. हे पक्षी झाडांच्या झावळीमध्ये किडे-कीटक शोधत फांदी कुरतडत टोकापर्यंत येतात व शेतांमधील पडलेले धान्यही खातात. आपल्या भक्ष्याच्या भोवती फेर धरून हवेत उडवून खातात.
या पक्ष्यांची घरटी कपाच्या आकाराची असून काडय़ाकाटक्या, मुळे वापरून बनवलेली असतात. घरटी उभ्या फांद्यांवर चिकटलेली किंवा झाडाच्या फांदीवर लोंबकळत असतात. मादी 2 ते 3 गुलाबीसर अंडी देते व 14 दिवस अंडी उबवते. त्यावेळी नर ‘मादी व पिल्लांना’ खाद्य पुरवतो.
पर्णपक्ष्यांचे गाणे, शीळ अतिशय मंजुळ असते. साद मात्र शिट्टी व किलबिल मिळून असते. पर्णपक्षी एक उत्तम नकलाकार आहेत!!
आज आपण पर्णपक्ष्यांच्या चार प्रजातींची माहिती करून घेणार आहोत.

जेर्डन पर्णपक्षी
जेर्डन पर्णपक्ष्याचा नर हिरव्या रंगाचा असून डोक्यावर पिवळ्या रंगाची छटा असते. चेहरा व गळा काळा असून निळ्या रंगाच्या मिशा असतात. मादीचे डोके हिरवे असून गळा निळ्या रंगाचा असतो. शिशु पक्षी मादीसारखे असून गळा मात्र निळा नसतो.

सुवर्ण कपाळी पर्णपक्षी
सुवर्ण कपाळी पर्णपक्ष्याचा नर हिरव्या रंगाचा असून चेहरा काळ्या रंगाचा असतो. गळ्यावर पिवळ्या रंगाची किनार असते. बुबुळं गडद तपकिरी असून पाय व चोच काळी असते. कपाळ पिवळे-नारिंगी रंगाचे असून मिशी निळ्या रंगाची असते. शिशु पक्षी हिरव्या रंगाचे असून चेहऱयावर व गळ्यावर काळ्या रंगाचा अभाव असतो. मादीचे रंग फिक्कट असतात. दक्षिणेकडील पक्ष्यांचे रंग थोडे हलके असतात. या पक्ष्यांची शीळ बुलबुल पक्ष्यासारखी असून चढत्या-उतरत्या स्वरातील किलबिल असते.

नारिंगी पोटाचा पर्णपक्षी
नारिंगी पोटाचा पर्णपक्ष्याची पाठ हिरव्या रंगाची असून पोट नारिंगी रंगाचे असते. शेपटी निळ्या रंगाची असून उडणाऱया पंखांमध्ये निळा रंग असतो. गळ्यावर व छातीवर काळा व निळ्या रंगाचा पॅच असतो. चोच बाकदार व लांब असते.

निळ्या पंखांचा पर्णपक्षी /
निळ्या पंखांचा पर्णपक्ष्याचा नर हिरव्या रंगाचा असून डोकं पिवळट रंगाचे असते. चेहरा व गळा काळ्या रंगाचा असतो. डोळ्यापासून गळ्यापर्यंत काळा रंग असून त्यात निळसर रंगाची मिशीसारखी रेषा असते. मादीचे डोकं हिरव्या रंगाचे असून गळा निळ्या रंगाचा असतो. शिशु पक्षी मादीसारखेच असून गळ्यावर निळा रंग नसतो. हे पक्षी जोडीने किंवा इतर पक्ष्यांच्याबरोबर ही आढळतात. यांची साद बऱयाच सुरांची एकत्र “pli-pli-chu-chu, chi-chi-pli-I” अशी असते.
गणेशगुडीला पक्ष्यांची फोटोग्राफी करण्यासाठी मी बरेच वेळा गेले, परंतु पर्णपक्ष्यांचे दर्शन झालेच नव्हते. तो योग मागील वर्षी आला. हिरव्या रंगांच्या या पक्ष्यांमध्येसुद्धा किती प्रजाती व रंगसंगती बघूनच मी आश्चर्यचकित झाले.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या