
अविश्वास प्रस्तावापूर्वी जनतेला संबोधित करताना इम्रान खान यांनी हिंदुस्थानचे कौतुक केल्याने त्यांना हिंदुस्थानात जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PLM-N) च्या नेत्या मरियम नवाज यांनी इम्रान खान यांना हिंदुस्थानात जाण्याचा सल्ला दिला आहे.
रशियासाठी आपले धोरण काय असावे हे हिंदुस्थानला सांगण्याची हिंमत कोणत्याही युरोपीय राजदूतात नाही. असे पाकिस्तानला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले होते. एवढेच नाही तर हिंदुस्थानातील जनता खूप प्रामाणिक असल्याचेही इम्रान खान म्हणाले होते.
तुम्हाला हिंदुस्थान इतका आवडत असेल तर तिथे जा
इम्रान खानच्या या वक्तव्यावर माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या मरियम नवाझ शरीफ यांनी इम्रान खानवर जोरदार टीका केली आहे. मरियम नवाज शरीफ यांनी ट्विट करून म्हटले आहे की, आपल्या हातातून खुर्ची निसटताना पाहून वेडा झालेल्या या व्यक्तीला कोणीतरी सांगावे की त्यांना त्यांच्याच पक्षाकडून हटवले जात आहे. जर तुम्हाला हिंदुस्थान इतकाच आवडत असेल तर पाकिस्तान सोडून हिंदुस्थानात जा.
मरियमने दिले वाजपेयींचे उदाहरण
मरियम शरीफ म्हणाल्या की, हिंदुस्थानची स्तुती करणार्याला हेही कळायला हवे की, हिंदुस्थानच्या वेगवेगळ्या पंतप्रधानांविरुद्ध 27 वेळा अविश्वास प्रस्ताव आणला गेला आहे, परंतु यापैकी कोणीही संविधान, लोकशाही आणि त्याच्या तत्त्वांशी तडजोड केली नाही. एका मताने पराभूत होऊन अटलबिहारी वाजपेयी घरी बसले. त्यांनी तुमच्यासारखे देश आणि राज्यघटना गहाण ठेवली नाही.
गुरुवारी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने उपसभापती कासिम सूरी यांनी विरोधकांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव फेटाळणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीला शनिवारी सकाळी 10.30 वाजण्यापूर्वी अविश्वास प्रस्तावाविषयी बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत.



























































