‘ली’च्या कुशीत विसावले नाही मातृत्वाचे सुख! गोरेवाडय़ातील वाघिणीने तिसऱया प्रसूतीतही गमावला बछडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
tigress-new

मातृत्व म्हणजे सुखद अनुभव. पण मूल जन्माला येताच ते गमवावे लागले तर ते दुःख न पचवता येणारे असते. गोरेवाडय़ातील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानातील ‘ली’ वाघिणीवरही नेमक्या याच दुःखाचा डोंगर कोसळला. एक-दोनदा नव्हे तर तिसऱयांदा मातृत्वाचा सोहळा रंगण्याआधीच तिच्या आनंदावर विरजण पडले. तिसऱया प्रसूतीतही तिला बछडा गमवावा लागला.

‘ली’ वाघिणीला मंगळवारी दुपारी प्रसूती वेदना सुरू झाल्या. सायंकाळी 4 च्या सुमारास तिने बछडय़ाला जन्म दिला. त्याला मायेने चाटल्यानंतर तिने बछडय़ाची शेपूट पकडून त्याला गवतात झाकले. थोडय़ा वेळाने त्याला पुन्हा उचलले. त्याचवेळी त्याच्या डोक्याला मार लागला आणि तो बछडा मरण पावला. यावेळी ‘ली’ पुन्हा दुसऱया बछडय़ाला जन्म देईल म्हणून पशुवैद्यकीय अधिकाऱयांनी वाट पाहिली, पण बुधवारी सकाळपर्यंत तसे काही झाले नाही. जन्म दिल्यानंतर बछडय़ाला उचलताना वाघिणीचा दात लागला व त्यात बछडय़ाचा मृत्यू झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. यावेळी प्राणिसंग्रहालयाच्या पशुवैद्यकांसह महाराष्ट्र मत्स्य आणि पशू विज्ञान विद्यापीठातील तज्ञ डॉक्टरांचे एक पथक प्राणिसंग्रहालयात उपस्थित होते. रात्री उशिरा वाघिणीच्या प्रसव वेदना थांबल्यानंतर तिच्या गर्भात आणखी पिले आहेत? याची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

ली व राजकुमारच्या भेटीचा असा जुळून आला योग!

2009 मध्ये ‘ली’ वाघीण महिनाभराची असताना ती चंद्रपूर जिह्यातून महाराजबाग प्राणिसंग्रहालयात आली. तीन वर्षांपूर्वी ‘राजकुमार’ वाघ भंडारा जिह्यातील एका लग्नसमारंभात आला होता. तेथून त्याची रवानगी थेट गोरेवाडय़ात करण्यात आली. त्याला सोबत म्हणून महाराजबाग प्राणिसंग्रहालयातून ‘ली’ वाघिणीलादेखील गोरेवाडय़ात आणले. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात दोघांना सफारीसाठी एकत्र सोडले. त्यातून 13 वर्षांची ‘ली’ गर्भवती राहिली.

दोन वर्षांपासून मातृत्वसुखाची प्रतीक्षा

गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातील ली आणि राजकुमार या वाघाच्या जोडीला पिले होण्यासाठी मागील दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. ‘ली’चे वय जास्त असल्याने प्रयत्नांना यश आले नव्हते. ‘ली’चे वय साधारण 11 वर्षे आहे. मागील महिनाभर ‘ली’ वाघिणीला राजकुमारपासून स्वतंत्र ठेवून तिच्या गर्भारपणासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. यापूर्वी 2018 मध्ये ‘ली’ गोरेवाडा बचाव केंद्रात ‘साहेबराव’ या वाघापासून गर्भवती राहिली होती.