विधान परिषदेवर शिवसेनेकडून अॅड. अनिल परब आणि मनीषा कायंदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख उद्या असून शिवसेनेकडून विद्यमान आमदार अॅड. अनिल परब यांना पक्षाने पुन्हा संधी दिली असून दुसऱ्या जागेसाठी मनीषा कायंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपकडून पाच, काँग्रेसकडून दोन, राष्ट्रवादीकडून एक तर शेकापकडून एका जागेसाठी अर्ज भरला जाणार असून ही निवडणूक बिनविरोध होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे.

विधानसभेतील २८९ सदस्य संख्येनुसार उमेदवाराला निवडून येण्यासाठी २५ मतांची आवश्यकता आहे. भाजपकडे १२२ मतांसह सात मतांसह सात अपक्ष आमदार असल्याने त्यांचे पाच उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यामुळे भाजपने आज महादेव जानकर, भाई गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील आणि राम पाटील रातोळीकर यांची उमेदवारी जाहीर केली.

शिवसेनेचे ६३ आमदार असल्याने शिवसेनेचे दोन उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. या दोन जागांसाठी शिवसेनेकडून अर्ज भरला जाणार आहे. काँग्रेसने शरद रणपिसे आणि वाजाहत मिर्झा यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादीने बाबा जानी दुर्राणी यांना संधी दिली आहे. दुर्राणी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखलही केला आहे.

विधान परिषदेच्या ११ व्या जागेसाठी शेकापचे जयंत पाटील इच्छुक असून त्यांनीही मतांची जुळवाजुळव केली आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार हे निश्चित मानले जात आहे.

यवतमाळ जिह्याचे दोन उमेदवार

विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी यवतमाळ जिह्याला लॉटरी लागली आहे. काँग्रेस व भाजपनेही या जिह्यावर लक्ष केंद्रित करून या जिह्यातील कार्यकर्त्यांना विधान परिषदेवर पाठविले आहे. काँग्रेसने डॉ. वजाहत मिर्झा यांना तर भाजपने नीलय नाईक यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे डॉ. वजाहत मिर्झा व नीलय नाईक हे यवतमाळच्या पुसद येथील रहिवासी आहेत. नीलय नाईक हे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचे पुतणे आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश घेतला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री मनोहर नाईक यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली होती, परंतु त्यात त्यांचा पराभव झाला होता.

भाजप: महादेव जानकर, भाई गिरकर, नीलय नाईक, रमेश पाटील आणि राम पाटील रातोळीकर

काँग्रेस: शरद रणपिसे आणि वाजाहत मिर्झा

राष्ट्रवादी: बाबा जानी दुर्राणी