
गेल्या अनेक महिन्यांपासून देवळाली प्रवरा परिसरात थांबलेले बिबटय़ाच्या हल्ल्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. पायी जाणाऱ्या आणि वाहनांवरील नागरिकांचा पाठलाग करून बिबटय़ा हल्ला करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. येथील केशव गोविंद बन व केसापूर सीमारेषेवर असलेल्या सुनील पुजारी यांच्या केळीच्या बागेजवळ बिबटय़ा दबा धरून बसतो आणि रस्त्यावरून जाणाऱया वाहनांचा पाठलाग करून हल्ला करीत असल्याचा प्रकार घडल्याने भीती पसरली आहे. येथे पिंजरा लावून बिबटय़ाला जेरबंद करण्याची मागणी नागरिक करीत असून, वन विभाग वेळकाढूपणा करीत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
केसापूर येथील सरपंच बाबासाहेब पवार यांचा मुलगा तेजस पवार व त्याचा मित्र मयूर भगत हे रात्री आठच्या सुमारास दुचाकीवरून केसापूर येथे घराकडे परतत असताना पुजारी यांच्या केळीच्या बागेत दबा धरून बसलेल्या बिबटय़ाने पाठलाग करून हल्ला केला. बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यात तेजस पवार जखमी झाले आहेत. बिबटय़ाने त्यांच्या डाव्या पायाच्या पोटरीवर नखांनी ओरखडे ओढले आहे. मागील महिन्यात केसापूर सोसायटीचे व्हाईस चेअरमन मधुकर रणदिवे यांचे पुतणे आकाश रणदिवे यांच्या पुतण्यावर याच भागात बिबटय़ाने हल्ला केला होता.
या परिसरात व नदीच्या काठावर लपण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जागा असल्याने येथे बिबटय़ांचा संचार आहे. बेलापूर ते आंबी हा वर्दळीचा रस्ता असल्याने शेतकरी, दुग्धव्यवसाय करणारे, नोकरदार, विद्यार्थी यांचा वावर असतो. तसेच जिह्यात नावाजलेले केशव गोविंद मंदिर येथे भक्तांचा ओघ सुरूच असतो. सकाळी व संध्याकाळी अनेक भक्त पायी जाऊन दर्शन घेतात. अशा परिस्थितीत बिबटय़ाचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असले तरी सरपंच पवार यांनी सातत्याने वन विभागाशी संपर्क करून या भागात पिंजरा लावून बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱयांनी ‘आधी ग्रामपंचायतचे पत्र द्या, मग कार्यवाही करू’, असे सांगत वेळकाढूपणा केला. वन विभागाचा हा वेळकाढूपणा भविष्यात एखाद्याच्या जीवावर बेतल्यावरच कारवाई करणार का, असा सवाल नागरिक करीत आहेत.
बुधवारी सायंकाळी वन विभागाच्या कर्मचाऱयांनी घटनास्थळी धाव घेऊन स्थळनिरीक्षण केले. मात्र, पुन्हा वन विभागाने मागचे पाढे वाचायला सुरुवात केली आहे. भविष्यात बिबटय़ाच्या हल्ल्यात एखाद्याचा जीव गेला तर त्यास वन विभाग जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
एक महिन्यापासून वन विभागाच्या संपर्कात आहे. बिबटय़ाला जेरबंद करण्यासाठी या भागात पिंजरा लावावा, अशी मागणी केली आहे. मात्र, वन विभागाकडून वेळकाढूपणा सुरू असून, भविष्यात एखाद्याचा बळी गेल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल करत वन विभागाने तत्काळ पिंजरा न लावल्यास बेलापूर – श्रीरामपूर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल.
– बाबासाहेब पवार, सरपंच, केसापूर.



























































