
एलआयसी म्हटले की विश्वास आला. याच विश्वासाच्या जोरावर हिंदुस्थानी सरकारी मालकीची विमा कंपनी एलआयसीने जगभरात विश्वासाची भुरळ घातली आहे. ग्लोबल मार्केट इंटेलिजन्सने जारी केलेल्या अहवालानुसार 2022 मधील विमा कंपन्यांच्या रँकिंगमध्ये हिंदुस्थान जीवन विमा महामंडळ (एलआयसी) ही जगातील सर्वात मोठी चौथी विमा कंपनी ठरली आहे.
एलिएन्ज एसई, चीन लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि निप्पॉन लाईफ इन्शुरन्स या तीन कंपनी एलआयसीच्या आधी आहेत. त्यानंतर चौथा क्रमांक एलआयसीचा आहे. सध्या एलआयसीकडे रोख गुंतवणूक साठा 503.7 अब्ज डॉलर इतका आहे. तर प्रथम क्रमांकावर असलेल्या जर्मनीच्या एलिएन्ज एसईचा गुंतवणूक साठा 750.20 अब्ज डॉलर, चीन लाईफ इन्शुरन्स कंपनीचा गुंतवणूक साठा 616.90 अब्ज डॉलर आणि निप्पॉन लाईप इन्शुरन्स कंपनीचा गुंतवणूक साठा 536.80 बिलियन डॉलर इतका गुंतवणूक साठा आहे. एलआयसी आणि निप्पॉन लाईफ इन्शुरन्स कंपनीचा गुंतवणूक साठा आर्थिक वर्ष 2023 (एप्रिल 2022 ते मार्च 2023 पर्यंत) मधील राखीव गुंतवणूक साठा आहे. जगातील सर्वात मोठय़ा 50 जीवन विमा कंपन्यांच्या यादीमध्ये 21 कंपन्या या केवळ युरोपमधील आहेत. त्यामुळे विमा कंपन्यांत युरोपचे वर्चस्व दिसले आहे, तर 17 आशियाई कंपन्यांना 50 च्या यादीत स्थान मिळाले आहे.






























































