अल्‍पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, खूनप्रकरणी जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, अलिबाग

कर्जत तालुक्यातील दामत येथील अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार करुन त्याचा खून करणार्‍या आरोपीला अलिबाग येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सलमान सलीम नजे (22 वर्षे रा. दामत) असे या आरोपीचे नाव आहे.

ही घटना 2015मध्ये घडली होती. त्याच गावातील 13 वर्षीय मुलगा हा नेरळ येथील मदरशामध्ये शिक्षण घेत होता. 26 मार्च 2015 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास तो घरी आला. त्यानंतर पावणे सहा वाजण्याच्या सुमारास त्याच्या आजीने त्यास गूळ आणण्यास सांगितले. आरोपी सलमान नजे हा त्यावेळीच मोटारसायकल घेऊन त्याच्या घरी आला होता. मयत मुलगा हा आरोपी सलमान याच्‍या मोटारसायकलवर बसून दुकानातून गुळ घेऊन आला. त्यानंतर पुन्हा तो आरोपी सलमान याचे सोबत मोटारसायकलवर बसून गेला होता. त्यानंतर संध्याकाळी उशिरापर्यंत तो घरी आला नाही. तो मशिदीमध्ये नमाज पढण्यासाठी गेला असावा, असे वाटल्याने त्याच्या पालकांनी थोडावेळ त्याची वाट पाहिली. मात्र तो परत आला नसल्याने त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. काही वेळाने त्याचा मृतदेह गावाजवळील एका आंब्याच्या बागेत असलेल्या पडीक घराच्या एका खोलीत दिसून आला. त्याच्या नाकावर, तोंडावर, मानेवर जखमांच्या खुणा दिसून आल्या. तो रक्तबंबाळ झाला होता.

याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी सलमान याला संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र त्याच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच वाढला. पोलिसी दणक्याने त्याला बोलते केल्यानंतर त्यानेच अत्याचार करून खून केल्याचे कबूल केल्यावर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांनी तपास पुर्ण करून अलिबाग येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

या खटल्याचे कामकाज अलिबाग येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश व्ही. एम. मोहिते यांच्या न्यायालयात सुरु होते. याकामी सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. प्रसाद पाटील यांनी एकूण 14 साक्षीदारांची साक्ष नोंदवली. हा खटला पूर्णपणे परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित होता. खटल्याच्या सुनावणीअंती आरोपीला न्यायालयाने कलम 302 अन्वये दोषी धरून जन्मठेप व रुपये पाच हजार रुपये दंड, कलम 377 सह पोक्सो कायदा कलम 4 अन्वये 10 वर्षे सक्तमजुरी व रुपये पाच हजार रुपये दंड तसेच भारतीय दंड सहिता कलम 201 अन्वये 7 वर्षे सक्तमजुरी व रुपये तीन हजार दंड अशी शिक्षा सुनावली.