चुकीच्या 5 सवयीमुळे हाडे ठिसूळ होऊ शकतात, जाणून घ्या आणि आजच बदला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शरीर निरोगी राहण्याकरिता हाडे मजबूत असणे आवश्यक आहे. हाडे बळकट राहण्याकरिता आहारात कॅल्शियमयुक्त आहाराची गरज असते, मात्र काही चुकीच्या सवयीमुळे आपल्या शरीराचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे ‘या’ चुकीच्या सवयींपासून वेळीच दूर राहणे गरेजेच आहे. जाणून घेऊया अशा चुकीच्या सवयीविषयी ज्यामुळे हाडांचे नुकसान होऊ शकते.

आपल्या शरीरात हाडांची भूमिका खूप महत्त्वाची असते. शरीराला रचना देण्याबरोबरच अवयवांचे संरक्षण आणि स्नायूंना आधार देण्यासाठी, कॅल्शियम साठवण्यासाठी हाडे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपली हाडे निरोगी आणि मजबूत राहणे आवश्यक आहे. अनेक वेळा नकळतपणे आपण अशा सवयी लावून घेतो की, ज्यामुळे आपली हाडे कमकुवत होऊन ती पोकळ होऊ शकतात. आपण आपल्या हाडांची विशेष काळजी घेणे आणि शक्य तितक्या लवकर वाईट सवयींपासून दूर राहणे आवश्यक आहे. याकरिता आपल्या रोजच्या आहारात हाडांच्या बळकटीसाठी आवश्यक असलेल्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक याशिवाय खाण्याच्या सवयी, जीवनशैलीतील सकारात्मक बदल करणेही खूप महत्त्वाचे आहे. यासाठी हाडांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यांविषयी पाहूया.

कॅल्शियम
आहारात अशा पदार्थांचा समावेश केलात की, ज्या पदार्थांमधून पुरेसे कॅल्शियम शरीराला मिळत नाही, हाडे झपाट्याने कमकुवत होऊ लागतात. त्यामुळे हाडांची घनता कमी होऊ लागते. याशिवाय कॅल्शियमच्या कमतरतेमुळे लवकर फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो.

शारीरिक कसरती
शारीरिकदृष्ट्या सक्रीय नसणे हेदेखील हाडांच्या कमकुवतपणाचे प्रमुख कारण आहे. जर तुम्ही जास्त शारीरिक काम केले नाही, तर त्यामुळे ऑस्टिओपोरोसिस या आजाराचा धोका वाढतो.

अल्कोहोल, तंबाखू
संशोधनानुसार, तंबाखू आपली हाडे कमकुवत करण्यात मोठी भूमिका बजावते. त्याचप्रमाणे, महिलांसाठी दिवसातून एकापेक्षा जास्त पेये आणि पुरुषांसाठी 2 पेक्षा जास्त पेये ऑस्टियोपोरोसिस या हाडांच्या आजाराचा धोका वाढवतात.

वजन कमी करण्यासाठी केलेल डाएट
वजन कमी करण्याच्या छंदात अचानक अन्न कमी करणे आणि वजन कमी होणे यामुळे देखील हाडे कमजोर होतात. ही परिस्थिती महिला आणि पुरुषांसाठी समान आहे. याशिवाय जर वजन कमी करण्याची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा सेलिआक रोग असेल तर त्याचा परिणाम शरीराच्या कॅल्शियम शोषण्याच्या क्षमतेवर होतो आणि हाडे कमकुवत होतात.

फॅमिली हिस्ट्री
फॅमिली हिस्ट्री हे देखील हाडे कमकुवत होण्याचे एक कारण असू शकते. आई-वडील किंवा भावंडांना ऑस्टिओपोरोसिस असेल, तर हा घातक हाडांचा आजार होण्याचा धोका वाढतो.

हाडांच्या मजबुतीकरिता…

कॅल्शियम रिच डाएट
जर तुम्हाला तुमची हाडे दीर्घकाळ निरोगी ठेवायची असतील तर त्यासाठी आजपासूनच आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करा. यासाठी दुग्धजन्य पदार्थ, बदाम, ब्रोकोली, काळे, सॅल्मन, मासे यांचा आहारात समावेश करता येईल.

व्हिटॅमिन डी
आपल्या शरीरात कॅल्शियम शोषून घेण्यासाठी व्हिटॅमिन डी पुरेसे असणे आवश्यक आहे. शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता भासू देऊ नका. यासाठी सॅल्मन, व्हाईट फिश आणि ट्यूना फिश खाऊ शकतो. मशरूम, अंडी आणि फोर्टिफाइड खाद्यपदार्थ यासारखे पदार्थ म्हणजे व्हिटॅमिन डीचा चांगला स्रोत आहे. सूर्यकिरण शरीराला जास्तीत जास्त व्हिटॅमिन डी पुरवतात.

शारीरिक कसरती
जर तुम्हाला तुमची हाडे मजबूत आणि निरोगी ठेवायची असतील, तर त्यासाठी व्यायाम, चालणे, जॉगिंग इत्यादी शारीरिक क्रियाकलापांचा रोजच्या दिनक्रमात समावेश करा. त्यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होईल. याशिवाय सिगारेट, दारू यांसारख्या व्यसनांपासून दूर राहा.