तुम्हाला तुमच्या वयापेक्षा दहा वर्षांनी लहान दिसायचे असेल तर ‘हे’ उपाय करा !

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काही व्यक्तींमध्ये तरुण वयातच वृद्धत्वाची लक्षणे दिसू लागतात, तर काहींचे वय जास्त असले तरीही कळून येत नाही. आपल्या ओळखीत किंवा समाजात वावरताना अशा व्यक्ती नजरेस येत असतात. तुमच्या सध्याच्या वयापेक्षा जास्त तरुण दिसण्याकरिता काय करायला हवे, हे जाणून घेणेही महत्त्वाचे आहे. पाहूया याकरिता कोणते उपाय करता येतील.

केसांना कलप करा

बहुतांश लोक केसांना रंग लावण्यास घाबरतात. याबद्दल त्यांचे अनेक गैरसमजही आहेत. आळशीपणा, लोकं थट्टा करतील असे वाटणे, अशी अनेक कारणे यामागे असू शकतात, पण ही चूक करू नका. पांढऱ्या केसांना रंग लावल्यास तुमचे वय अगदी कमी वेळातच काही मिनिटांनी कमी झाल्याचे दिसू शकते. आरशात पाहूनही छान वाटतं. पांढऱ्या केसांमुळे तुमचे वय वाढल्याची जाणीव तुम्हाला सतत होत राहते. यामुळे केस पांढरे झाले असल्यास त्यांना रंग देणे आवश्यक आहे.

चेहऱ्याचा व्यायाम

10 सेकंद आपल्या तोंडात हवा धरून ठेवा आणि सोडा. जोरात किंचाळतात तसे तोंड उघडा. तोंडाला ताण पडेल असे उघडा. 10 सेकंद थांबा आणि पुन्हा सामान्य स्थितीत परत या. एक मोठे हास्य 10 सेकंद करा. त्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीत या. चेहऱ्याच्या वेगवेगळ्या भागाला ताण देण्याचा व्यायाम दररोज 15 मिनिटे करा. यूट्यूब व्हिडिओद्वारे असे अनेक व्यायाम जाणून घ्या आणि ते दररोज करा. घरातील कोणतीही कामे करताना, टीव्ही पाहताना तुम्ही हे करू शकता. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात, चेहऱ्यावर चमक येते. यामुळे तुम्ही तरुण दिसू शकता.

तरुण दिसणारे कपडे घाला

आपण आजी-आजोबा, सासू-सासरे, काका-काकू झालात, त्यामुळे तरुणांना शोभणारे कपडे तुम्हाला शोभणार नाहीत, लोकं काय म्हणतील? असा विचार करू नका. जीवन तुमचे आहे. तुम्हाला हवे ते कपडे तुम्ही घालू शकता. ज्या पद्धतीचा पोषाख तुम्ही लहान वयात परिधान केला नसेल तो तुम्ही आवडीने आताही परिधान करू शकता. यामुळे तुमची ते कपडे घालण्याची राहून गेलेली आवड पूर्ण होईल. महिला जीन्स आणि कुर्ती, जीन्स-टॉप घालू शकता. साडी नेसून कंटाळा आला असेल तर सलवार सूट घालू शकता. केस कापून घेऊ शकता. स्वत: ला एक नवीन रूप देऊ शकता. पुरुष टी-शर्ट घालू शकतात.

आहाराची काळजी घ्या

खाण्यापिण्याचा परिणाम आपल्या शरीरावर बऱ्याच प्रमाणात होत असतो. यामुळे आपल्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्या. पौष्टिक आहार घ्या. प्रथिने, जीवनसत्त्वे, लोह या सर्व पोषक घटकांनी युक्त अन्न खा. आहारात फळांचा समावेश करा. रस प्या. रोज एक ग्लास दूध प्या. काजू आणि बदाम खा. अंडी खा. या पदार्थांमुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येईल. तरुण दिसायला लागाल.

छंदांसाठी वेळ द्या

छंद जोपासाल तेव्हा तुम्ही मनापासून आनंदी राहाल. यामुळे चेहरा आनंदी दिसेल. शरीरात उत्साह संचारेल. याकरिता खेळा, खूप हसा, नृत्य करा, संगीत ऐका. या सर्व अनुभवामुळे तुम्ही ताजेतवाने व्हाल.

मनाने तरुण राहण्याचा प्रयत्न करा 

स्वत:चे वय झालेय, आता काही करता येण्याजोगे नाही, असा नकारात्मक विचार मनात आणू नका. त्याऐवजी तुम्हालाही अजूनही मजा करण्याचा अधिकार आहे. तुम्हाला हवे तेव्हा तुम्ही लहान मुलांसारखा अनुभव घेऊ शकता. फक्त यासाठी लाजाळूपणा किंवा संकोच सोडावा लागेल.