
सामना प्रतिनिधी । परभणी
विद्युत मीटर बसविण्यासाठी आणि सर्व्हे अहवाल देण्यासाठी गंगाखेड अर्बन वीज वितरण कंपनीचा तंत्रज्ञ (लाईनमन) योगेश सुभाष मुंडे यास सारडा कॉलनी येथील सार्वजनिक रस्त्यावर ३ हजार ८०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू होती.
गंगाखेड शहरातील एका वीज ग्राहकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीत विद्युत मीटर बसविण्यासाठी आणि सर्व्हे अहवाल देण्यासाठी गंगाखेड अर्बन वीज वितरण कंपनीचा तंत्रज्ञ (लाईनमन) योगेश सुभाष मुंडे हा या कामासाठी म्हणून लाच मागितली होती. या कर्मचार्याने तडजोडी अंती ३ हजार ८०० रुपये लाचेची मागणी केली. या तक्रारीत तथ्य आढळल्याने लाचलुचपत पथकाच्या विभागाने गंगाखेड शहरातील सारडा कॉलनी येथील सार्वजनिक रस्त्यावर लाईनमन योगेश मुंडे (२६) याला ३ हजार ८०० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर, अप्पर पोलीस अधीक्षक नुर मो. शेख, पोलीस उपाधीक्षक गजानन विखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल गव्हाणकर, विवेकानंद भारती यांनी सापळा रचला. त्यांना हनुमंते, अनिल कटारे, अविनाश पवार, सचिन गुरसुडकर, धबडगे, अनिल कटारे, लक्ष्मण मुरकुटे, चट्टे, मुखीद, चौधरी, बोके, टेहरे यांनी हा सापळा यशस्वी करण्याची कामगिरी बजावली. याप्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात लाईनमन योगेश मुंडे यास जेरबंद करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.






























































