
21 दिवसांचे लॉक डाऊन सुरू असताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी किराणा मालाची दुकाने चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र गोव्यात सोशल मीडिया वरुन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय मागे घ्यावा म्हणून जोरदार मागणी होऊ लागली आहे. त्यातच पीर्ण येथे नर्सरी मध्ये शिकत असलेल्या अनया गावस या चिमूरडीने पोलिसात असलेल्या आपल्या वडिलांची चिंता वाटत असल्याने मुख्यमंत्र्यांना एक आवाहन केले आहे. या संवेदनशील आवाहनामुळे सगळ्यांची मने पिळवटून निघाली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा देशव्यापी लॉक डाउन जाहीर केल्यामुळे आवश्यक जीवनावश्यक वस्तुंचा साठा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. मात्र काही ठिकाणी दुकाने बंद राहिल्यामुळे अन्नधान्य, दूध आणि भाजीपाला मिळत नव्हते. त्यामुळे लोकांचा रोष वाढतच होता. विरोधक आणि लोकांचा दबाव वाढू लागल्या नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन शुक्रवार पासून किराणा मालाची दुकाने 24 तास सुरू राहतील अशी घोषणा केली होती. किराणा माल,दूध आणि भाजीपाला खरेदी करण्यासाठी येणाऱ्या लोकांची गर्दी हाताळण्याचे काम लोकांमध्ये मिसळून पोलिसांना करावे लागत असल्याने पोलिसांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली आहे.
पिर्ण येथे नर्सरी मध्ये शिकत असलेल्या अनयाचे वडील पोलिसात आहेत. ड्यूटी करताना त्यांना कोरोनाचा धोका असून देखील लोकांमध्ये मिसळून काम करावे लागत आहे. अनयाला सुद्धा हा धोका सतावत आहे. गर्दीत मिसळून काम केले तर काहीही होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने अनयाने मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना विनंती करत आपल्या वडीलांसह इतर पोलिसांना सुट्टी देऊन या धोक्या पासून वाचवावे अशी आर्त साद घातली आहे.
‘मला माझ्या वडिलांना गमवायच नाही असे भावनिक आवाहन देखील तिने केले आहे. अनयाने लोकांना हात जोडून विनंती केली आहे. ती म्हणते ‘लॉक डाउन यशस्वी करा. काही दिवस भाजी आणि दूध मिळाल नाही तर काही बिघडणार नाही’. असा संदेश लिहलेले पोस्टर घेऊन ती जनजागृती करत आहे. तिचा हातात पोस्टर घेतलेला फोटो सध्या व्हायरल झाला आहे. दरम्यान आज सकाळ पासून किराणा माल,भाजीपाला आणि दूध खरेदी करण्यासाठी येत असलेल्या लोकांची गर्दी होऊ न देता सगळी व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे काम पोलिस यंत्रणा करत आहे.




























































