उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यात कोणताही बदल नाही!- संजय राऊत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । अयोध्या

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निश्चित झालेल्या दौऱ्याची आधीच माहिती देण्यात आल्यानंतर देखील काही दिवसांपासून उद्धव ठाकरे येणार की नाही, असा भ्रम (अफवा) पसरवला जात आहे. त्यांच्या कार्यक्रमाच्या तारखेत बदल केल्याची चर्चा केली जात आहे. मात्र मी या पवित्र भूमीवरून घोषणा करू इच्छितो की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं 24 नोव्हेंबर रोजी अयोध्येत आगमन होईल, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

24 नोव्हेंबर रोजी दुपारी अयोध्येतील विमानतळावर ते पोहोचतील. तिथे त्यांचे स्वागत होईल. त्या दिवशी त्यांचे दोन कार्यक्रम होतील. दुपारी 3 वाजता लक्ष्मण किल्ला या भागात महाराजींच्या आशीर्वादाने तिथे आशीर्वाद समारोह होईल, संत पूजन होईल. त्याचे मुख्य यजमान हे उद्धव ठाकरे असतील. त्या कार्यक्रमाचे आयोजन हे राजकीय नसेल. त्याचे आयोजन हे अयोध्यावासींनी केले आहे. तिथे सर्व संतांचे पूजन व्हावे अशीच सर्वांची इच्छा आहे. त्यामुळे हा राजकीय कार्यक्रम नाही. तिथे सर्व साधू-संत, अयोध्येतील जनता, मंदिरांचे प्रमुख, मंदिरांचे पुजारी, हिंदू धर्मिय संस्थांचे लोक असे सगळे उपस्थित असतील, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरे यांना सर्व संतांचे आशीर्वाद मिळावे अशी इच्छा आहे. त्यामुळे सर्वांना आमंत्रण दिले आहे, जवळपास सर्वांनी त्याचा स्वीकार केला आहे.

तसेच अयोध्येतील विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांची भेट घेतली असून त्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. त्यांनी देखील आमंत्रण स्वीकारल्याची माहिती राऊत यांनी यावेळी दिली.

उद्धव ठाकरे हे अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. अयोध्या आंदोलनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. शिवसेनेने 25 वर्षांपूर्वी अयोध्येत येऊन राम मंदिर निर्माणासाठी आणि बाबरी कलंक मिटवण्यासंदर्भात जे काम केलं आहे ते देशाच्या आणि हिंदूंच्या इतिसाहात नोंदवले गेले आहे. ते कुणी मिटवू शकत नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. तसेच उद्धव ठाकरेंचीही भूमिका आहे की अयोध्येत राम मंदिर हे सर्वांच्या सहमतीने उभे रहावे. त्यांची अशी देखील भूमिका आहे की आज आम्ही महाराष्ट्रात किंवा देशात जे सत्तेचं फळ चाखतो (सत्ता उपभोगत) आहोत ती श्रीरामांची कृपा आहे. श्रीराम नसते तर आम्ही देशाच्या राजकारणात ज्या ठिकाणी पोहोचलो आहोत तिथे पोहोचू शकलो नसतो. म्हणून श्रीरामाचे मंदिर बनलेच पाहिजे. त्यासाठी संसदेत यासंदर्भात कायदा बनवा म्हणून प्रस्ताव आणला गेला पाहिजे. त्या प्रस्तावाला शिवसेना पूर्ण ताकदीने समर्थन देईन. त्यामुळे कायदा बनवा, अध्यादेश आणा हीच भूमिका घेऊन उद्धव ठाकरे अयोध्येत येत आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

उद्धव ठाकरे हे सकाळी काही निवडक प्रतिनिधींसह 25 नोव्हेंबर रोजी श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी जातील. रामचंद्रांचे दर्शन-पूजन झाल्यानंतर ते दुपारी 12 वाजता पत्रकारांशी संवाद साधतील. शिवसेना पक्षप्रमुख येणार आहेत म्हणून महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक येणार आहेत. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे संवाद साधतील असा हा कार्यक्रम असेल, यात आता कोणताही बदल होणार नाही असं ही त्यांनी सांगितलं.

कार्यक्रम शांततेत पार पडेल!

हा कार्यक्रम अत्यंत शांतते आणि प्रशासनाच्या सहकार्याने होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुम्ही सर्वांनी कायमच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम केलं आहे, आशीर्वाद दिले आहेत, त्यामुळे हा कार्यक्रम शांततेत पार पडेल.

सर्वांना सोबत घेऊन राम मंदिर निर्माणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करू!

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, उद्धव ठाकरे यांचा दौरा दसरा मेळाव्यात जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे त्यात बदल होणार नाही. अन्य धार्मिक कार्यक्रमास आमचा कोणताही विरोध नाही. सर्व हिंदुत्ववादी संघटना एक आहेत. विश्व हिंदू परिषदेचा कार्यक्रम असेल तर तिथल्याही साधू-संतांचे आशीर्वाद घेऊन आम्ही सर्व हातात हात घेऊन राम मंदिर निर्माणाच्या कार्यक्रमाचे आयोजन करू असं त्यांनी स्पष्ट केलं.