
सामना ऑनलाईन, पंढरपूर
विजयसिंह मोहिते पाटील हे भाजपकडून खासदारकीची निवडणूक लढवणार असल्याचे कळतंय. त्यांना भाजप माढ्यातून उमेदवारी जाहीर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपने माढ्यासाठीचा आपला उमेदवार अजून जाहीर केलेला नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला मोठं खिंडार, रणजितसिंह मोहीते पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार
माढ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच भाजपमध्ये आलेल्या रणजितसिंह निंबाळकर यांचे नाव चर्चेत होते. मात्र इथे राष्ट्रवादी काँग्रेसला टक्कर देऊन विजय मिळवायचा असेल तर आणखी तगडा उमेदवार आपल्याला गरजेचा आहे असं महाराष्ट्र भाजपने पक्षनेतृत्वाला सांगितल्याचं कळतंय. विजयसिंह मोहिते पाटील हे सर्वार्थाने वजनदार नेतृत्व असल्याने त्यांना इथून उमेदवारी देणं योग्य ठरेल असं भाजपला वाटायला लागलं आहे.
विजयसिंह मोहिते-पाटील यांचा मुलगा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी त्यापूर्वी आपणही भाजपमध्ये गेल्याचं सांगितलं होतं, मात्र त्यांचा जाहीर प्रवेश झाला नव्हता. त्यांना जाहीर प्रवेश करून घेत नंतर त्यांची उमेदवारी जाहीर करावी असा विचार भाजप करत असल्याचं सांगण्यात येत आहे.



























































