
सामना ऑनलाईन । पंढरपूर
काँग्रेसचे सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता राष्ट्रवादीचे माजी खासदार रणजितसिंह मोहीत पाटील हे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सकाळी साडे अकरा वाजता वानखेडे स्टेडियमवरील गरवारे क्लबमध्ये त्यांचा रितसर प्रवेश होणार आहे. रणजितसिंह यांनी त्यांचे वडील व राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली. रणजितसिंह यांच्यासोबत विजयसिंह देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अन्य भाजप नेते उपस्थित राहणार आहेत. ऐन लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर रणजितसिंहनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने माढा मतदार संघात आघाडीला मोठा फटका बसणार असल्याचे बोलले जातेय.
पक्षांत्तराच्या पार्श्वभूमीवर विजयसिंह मोहिते पाटील यांनी आज अकलूज येथे समर्थकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत घुसमट होते आहे भाजप मध्ये प्रवेश करा अशी जोरदार मागणी केली. यावर बोलताना रणजितसिंह यांनी शेतकऱ्यांच्या हिताची कृष्णा भीमा योजनेची राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थट्टा केली. ही योजना करायची असेल तर ती भाजपचं करू शकते म्हणून भाजप मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेत आहोत. सत्ता पद यासाठी हा पक्ष प्रवेश नाही. शेती व पाण्याची कामे गतीने व्हावीत यासाठी पक्ष प्रवेश आहे. उद्या बुधवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियम येथे दुपारी साडे बारा वाजता पक्ष प्रवेश होणार आहे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अन्य भाजप नेते उपस्थित राहणार असल्याचे रणजितसिंह यांनी स्पष्ट केले. रणजितसिंह यांच्या भाषणानंतर मनोगत व्यक्त करताना विजयसिह मोहिते पाटील यांनी मी रणजितच्या मागे ठाम उभे आहे असे सूचक वक्तव्य करुन आपल्या पक्ष प्रवेशाबाबत गूढ ठेवले.























































