
सामना प्रतिनिधी । वसई
काँग्रेस राष्ट्रवादीवाले युतीचे भांडण व्हावे, फाटावे म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते आता या निवडणुकीत त्यांना बुडवा, असा सणसणीत टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. पालघर मतदार संघातील प्रचारावेळी उद्धव ठाकरे यांनी वसई येथे भेट दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार हल्ला चढवला.
विरोधकांनी आमच्यात पुन्हा मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न केला. दोन हिंदुत्ववादी पक्ष भांडत होते. विरोधक त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांचा हा डाव एकत्र येऊन आम्ही हाणून पाडल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मधल्या काळात बातम्या उठल्या होत्या. भाजपा नाराज, रिपाई नाराज पण असे कोणी नाराज नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बरेच महिन्यांनी बऱ्याच वर्षांनी शिवसेना-भाजप युती एकत्र आली. मधल्या काळात विखुरलेली शक्ती पुन्हा एकत्र आली आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. केवळ पालघर राज्यापुरता नव्हे तर देशात भगवा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही, अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवसेना भाजपा पूर्वीही एकमेकांचे सहकारी होते. आजही आहोत, असेही त्यांनी सांगितले.
मला श्रीनिवास वनगाला धन्यवाद द्यायचे आहेत. प्रामाणिक मनमिळावू कार्यकर्ता या निमित्ताने लाभला. श्रीनिवासला पालघरमधून लोकसभेवर पाठवायचे नक्की केले होते पण त्यानंतर त्यांने त्याचे मनोगत माझ्याकडे व्यक्त केले की माझ्या बाबांसारखे नेतृत्व माझ्यात निर्माण करायचे आहे. मी आधी विधानसभा क्षेत्रात काम करतो. त्यांने सांगितले त्यामुळेच निर्णय घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नव्या उमेदवाराचा शोध घेण्यापेक्षा आपल्याकडे आपल्याकडे युतीचा खासदार गावितांच्या रूपाने होता. यावर मुख्यमंत्र्यांशी बोललो आणि मग निर्णय घेतला. अशी भक्कम युती मला वाटते देशांमध्ये कुठे झाली नसेल, असेही ते म्हणाले.
वसईकरांनो तुम्ही कुणाचेही गुलाम नाही. तुमच्यावर कोणी गुंडागर्दी करत असेल तर या गल्लीबोळातल्या गुंडांची मुजोरी सरकार म्हणून आम्ही मोडून काढू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गावितांच्या विजयाची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो, असेही ते म्हणाले.
यापूर्वी या मतदारसंघात झालेल्या निवडणूकीत आम्ही वेगवेगळ्या स्टेजवर प्रचार करत होतो. ताकदीने मैदानात उतरलो होतो, पण नंतरचा एकूणच कालखंड पाहिल्यावर असे ठरवले झाले ते झाले, नव्या ताकतीने एकत्र आलो असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
































































