गोरखपूरमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रमुख भूमिकेत; उमेदवार रवी किशन सहकलाकार

सामना ऑनलाईन । गोरखपूर

उत्तर प्रदेशच्या गोरखपूर मतदारसंघातील लढत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत गमावलेला गोरखपूरचा बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी आदित्यनाथ यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्यामुळेच या मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि लोकप्रिय भोजपुरी कलाकार रवी किशन सध्या सहकलाकाराच्या भूमिकेत असून योगी प्रमुख भूमिकेत वावरताना दिसत आहेत.

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गड मानला जाणारा गोरखपूर मतदारसंघ पुन्हा भाजपच्या पारडय़ात पडावा यासाठी योगी आणि त्यांच्या संतपीठाने पूर्ण ताकद झोकून दिली आहे. साथीला हिंदू युवा वाहिनी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज आहेच. या मतदारसंघातील भाजपच्या प्रचाराची धुरा स्वतः आदित्यनाथ यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे.

भोजपुरी सुपरस्टार रवी किशन यांची लोकप्रियता आणि भाजपची ताकद यांच्या संगमातून गोरखपूरची जागा पुन्हा जिंकणारच अशी प्रतिज्ञाच योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.