
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे सर्व टप्पे पूर्ण होताच विविध वृत्तवाहिन्या आणि एजन्सीजचे एक्झिट पोल जाहीर झाले असून त्यात एनडीएला इंडिया आघाडीच्या पुढे दाखवण्यात आले आहे. एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आला आहे. मात्र हे एक्झिट पोल नाही, तर मोदी – मीडिया पोल आहेत असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीला 295 जागा मिळेल असा विश्वासही व्यक्त केला.
माध्यमांनी एक्झिट पोलबाबत विचारले असता राहुल गांधी म्हणाले की, हे एक्झिट पोल नसून मोदी मीडिया पोल आहेत. हे त्यांचे फॅन्टसी पोल आहेत. जवळपास अनेक जागांवर कांटे की टक्कर असून निकाल आल्यावरच सर्व चित्र स्पष्ट होईल. इंडिया आघाडीला किती जागा मिळतील असे विचारे असता राहुल गांधी म्हणाले की, तुम्ही सिद्धू मुसेवाला याचे गाणे 295 ऐकले आहे का? ऐकले असेल तर समजून जा. याचाच अर्थ राहुल यांनी इशाऱ्या इशाऱ्यात इंडिया आघाडी 295 जागा जिंकेल असे म्हटले.
दरम्यान, महाराष्ट्रातील निकालांत शिवसेनेच्या मशालीचे तेज पाहायला मिळणार असून महाविकास आघाडीची ताकद दिसेल असे सर्वांचेच म्हणणे आहे. महाविकास आघाडीच्या दणक्याने भाजपला किमान 20 जागांचा फटका बसेल, असा अंदाज बांधण्यात आला आहे.
धाराशिव मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना आघाडी मिळणार असल्याचे टीव्ही-9च्या एक्झीट पोलमधून समोर आले आहे. या ठिकाणी अजित पवार गटाच्या अर्चना पाटील पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. साताऱ्यात भाजपकडून निवडणूक लढवणारे उदयनराजे नाही तर महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदेच विजयी होऊन कॉलर उडवतील असा अंदाज आहे.
<
हे एक्झिट पोल नाही, तर मोदी – मीडिया पोल आहेत; राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया#Rahulgandhi pic.twitter.com/DdOMQsOEjq
— Saamana (@SaamanaOnline) June 2, 2024
/p>
तामिळनाडू शतप्रतिशत इंडिया!
दक्षिणेतील तामिळनाडूत इंडियाला शतप्रतिशत यश मिळेल असा अंदाज आहे. येथे 39 जागा असून त्यात 37 ते 39 जागा इंडिया आघाडी जिंकेल असा अंदाज एबीपी-सीव्होटरने व्यक्त केला आहे. तर इंडिया टुडेने इंडिया आघाडीला 33 ते 37 जागा दाखवल्या आहेत. केरळमध्ये 20 जागांपैकी 16 जागा यूडीएफला, 5 जागा एलडीएफला तर 2 जागा मिळतील असे सर्व्हेचे म्हणणे आहे. तेलंगाणात कांटे की टक्कर आहे. तिथे इंडिया आघाडीला 17 पैकी 7 ते 9 जागा तर एनडीएलाही 7 ते 9 जागा मिळतील.
इंडिया जिंकणार हा जनतेचा सर्व्हे
इंडिया आघाडी किमान 295 जागा जिंकणार आहे. त्यापेक्षा कमी जागा येणार नाहीत. हा आमचा सर्व्हे नाही तर जनतेचाच सर्व्हे आहे. सरकारी सर्व्हे होतच असतात. त्यांच्याकडे आकडे लावण्याचे आणि बिघडवण्याचे तंत्र पहिल्यापासूनच आहे. त्यांचे मीडियातले दोस्त आकडे रंगवून सांगतात. म्हणूनच सत्य काय आहे आणि जनतेच्या मनात काय आहे हे मी तुम्हाला सांगत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली.
बारामतीत सुप्रिया सुळेंचा विजय निश्चित; अजित पवारांना धक्का
टीव्ही-9 पोलस्ट्रटनुसार बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव करून सुप्रिया सुळे विजयी होणार आहेत. अजित पवार गट शिरूर, रायगड आणि धाराशीव या जागाही गमावणार आहे.
ठाण्यात विचारे मिंध्यांना धूळ चारणार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाण्यातच धक्का बसणार असल्याचे टीव्ही 9 च्या पोलनुसार स्पष्ट झाले आहे. या ठिकाणी शिवसेनेचे निष्ठावंत राजन विचारे हे मिंधे गटाच्या नरेश म्हस्के यांना पराभवाची धूळ चारणार आहेत.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीची मुसंडी
महाराष्ट्रात महाविकास आघाडी जबरदस्त मुसंडी मारेल आणि त्यात शिवसेनेच्या मशालीचे तेज पाहायला मिळेल, अस स्पष्ट झाले आहे. फोडाफोडीचे राजकारण करणाऱया भाजपला किमान 20 जागांचा फटका बसणार आहे. टीव्ही 9 च्या पोलनुसार शिवसेनेला 14, काँग्रेसला 5 आणि राष्ट्रवादीला 6 अशा महाविकास आघाडीला 25 जागा मिळतील. भाजपला 19, शिंदे गटाला 4 तर अजित पवार गटाला भोपळा दाखवण्यात आला आहे. टाइम्स नाऊ नवभारत-ईटीजीच्या सर्व्हेत शिवसेना 13 ते 15, काँग्रेस 4 ते 5, राष्ट्रवादी 3 ते 4, भाजप 20 ते 22, शिंदे गट 4, अजित पवार गट 1 जागा जिंकेल असा अंदाज आहे. ऑक्सिस-माय इंडियाचा शिवसेना 9 ते 11, काँग्रेस 3 ते 4, राष्ट्रवादी 3 ते 5, भाजप 20 ते 22 असा अंदाज आहे.
अंदाज अपना अपना…
एजन्सी एनडीए इंडिया अन्य
टीव्ही 9 346 162 35
एबीपी-सीव्होटर 353-383 152-182 4-12
इंडिया टुडे 361-401 131-166 8-20
टाइम्स नाऊ 358 152 33
सरासरी 365 145 32






























































