Lok Sabha 2019 दिवस सुगीचे सुरू जाहले, 540 कोटी सापडले!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देशात सुगीचे दिवस सुरू झाले आहेत. पैशांचा पाऊस पडत आहे. दारूच्या नद्या वाहू लागल्या आहेत. लाखोंच्या किमतीचे अमली पदार्थ फुकटात मिळू लागले आहेत. महागडे सोनेही मतांसाठी स्वस्त झाले आहे. कारण वातावरण निवडणुकीचे आहे. गेल्या पंधरवडय़ात निवडणूक आयोगाने रोख रक्कम, बेकायदा दारू, अमली पदार्थ, सोन्याच्या वस्तू असा सुमारे 540 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

निवडणुका निःपक्षपातीपणे आणि सुरक्षित पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली आहे. निवडणुकीत होणारे संभाव्य गैरप्रकार रोखण्यासाठी आयोगाची पथके कार्यरत आहेत. या पथकांनीच हा 539.99 कोटींचा मुद्देमाल जप्त केला आहे. तामीळनाडूमध्ये सर्वाधिक ऐवज जप्त केला गेला. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणाचा क्रमांक लागतो.

निवडणुकीसाठी पैशांचा बेकायदा वापर रोखणे, उमेदवारांच्या खर्चावर बारीक लक्ष ठेवणे तसेच सोशल मीडियावरून प्रसारित होणाऱ्या संदेशांची तपासणी करण्यासाठी निवडणूक आयोगाने निरीक्षक नेमले आहेत. या निरीक्षकांची पथके माहिती मिळेल तशा विविध ठिकाणी धाडी घालत आहेत.

जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत

  • तामीळनाडू-107.24 कोटी
  • उत्तर प्रदेश-104.53 कोटी
  • आंध्र प्रदेश-103.4 कोटी
  • पंजाब-92.8 कोटी
  • कर्नाटक-26.53 कोटी
  • महाराष्ट्-19.11 कोटी
  • तेलंगणा-8.2 कोटी

निवडणूक आयोगाने गेल्या 10 मार्च रोजी देशातील निवडणूक जाहीर केली. तेव्हापासून 25 मार्चपर्यंत आयोगाच्या पथकांनी 143.37 कोटी रुपयांची रोख रक्कम, 89.64 कोटी रुपयांची बेकायदा दारू, 131.75 कोटी रुपयांचे अमली पदार्थ, 12.20 कोटी रुपयांचे सोन्याचे व महागडय़ा धातूंचे दागिने आणि 12.20 कोटी रुपयांच्या अन्य महागडय़ा वस्तू जप्त केल्या आहेत. मतदारांना आमिष दाखवण्यासाठीच त्यांचा वापर होणार होता असा आयोगाला संशय आहे. निवडणूक आयोगाने ही आकडेवारी आज जाहीर केली.

  • 143 कोटी रोख
  • 90 कोटींची दारू
  • 131 कोटींचे अंमली पदार्थ
  • 162 कोटींचे दागदागिने
  • 12 कोटींचे इतर साहित्य