
वेगवान मुंबईकरांना ज्याप्रमाणे फास्ट लोकल पकडण्याची घाई असते त्याप्रमाणेच आशियातील पहिल्या महिला डिझेल लोको पायलट मुमताज काझी यांनीदेखील ‘फास्ट लोकल’च चालवायला आवडते असे प्रांजळपणे सांगितले. त्यामुळे डय़ुटी संपवून पटकन घरीही जायला मिळते’ अशी मिष्कील प्रतिक्रिया त्यांनी दिली. मध्य रेल्वेच्या मोटरवुमन मुमताज काझी यांना सन 2015 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ‘महिला शक्ती पुरस्कार’ मिळाला आहे.
सध्या मुमताज सीएसएमटी ते ठाणे लोकलला डय़ुटीवर आहेत. मुलुंडला जेव्हा अनेक प्रवासी केबिनकडे येऊन धन्यवाद म्हणत आपल्याला नमस्कार करून जातात त्यावेळी आपण काहीतरी वेगळे करतोय असे वाटते. मला फास्ट लोकलच चालवायला आवडत असून मुख्य मार्गावरील डय़ुटी अधिक भावते. लोकलमध्ये सिमेन्सपेक्षा बम्बार्डिअरच माझ्या अधिक पसंतीची आहे. कारण तिचा वेग प्रति तास 100 कि.मी. इतका असल्याचे मुमताज म्हणाल्या.






























































