हिंदुस्थान-न्यूझीलंड उर्वरित लढत आज होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। मँचेस्टर

हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यामधील वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पावसाने व्यत्यय आणल्यामुळे जगभरातील क्रिकेटप्रेमी नाराज झाले. हिंदुस्थानी गोलंदाजांची प्रभावी गोलंदाजी… कर्णधार केन विल्यमसन (67 धावा) व अनुभवी रॉस टेलर (खेळत आहे 67) यांची दमदार अर्धशतके… अन् पावसाच्या हजेरीने मंगळवारचा दिवस गाजला. न्यूझीलंडने 5 बाद 211 धावा केल्यानंतर एकही चेंडू टाकला गेला नाही. अखेर पंचांनी लढत स्थगित करण्याचा निर्णय घेतला. उद्या आता या लढतीचा उर्वरित खेळ होणार असून बुधवारीही पावसामुळे लढत पूर्ण होऊ न शकल्यास साखळी फेरीतील सरस गुणांच्या जोरावर टीम इंडिया फायनलमध्ये प्रवेश करील. लढतीचा निकाल लागण्यासाठी विराट कोहलीच्या ब्रिगेडने किमान 20 षटके खेळणे अनिवार्य आहे.

मँचेस्टर येथील उभय संघ खेळत असलेल्या खेळपट्टीवर याआधी लढत झाली नव्हती. त्यामुळे ही खेळपट्टी नवीकोरी होती. ती कोणता रंग दाखवील याचा अंदाज बांधणे कठीणच होते. तरीही केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. जसप्रीत बुमराह व भुवनेश्वर कुमार या जोडगोळीने सुरुवातीला गोलंदाजीचा ‘भन्नाट’ स्पेल टाकला. न्यूझीलंड फलंदाजांचा सावध पवित्रा, हिंदुस्थानी गोलंदाजांची प्रभावी कामगिरी व खेळपट्टीचा रागरंग या तीन कारणांमुळे पूर्वार्धात ‘दे दणादण’ फटकेबाजी बघायला मिळाली नाही. भुवनेश्वर कुमारच्या अन् डावातील पहिल्याच चेंडूवर मार्टीन गप्टील पायचीत होता होता वाचला. हिंदुस्थानने या वेळी ‘रिह्यू’ गमावला. मात्र चौथ्या षटकात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर मार्टीन गप्टील एका धावेवर दुसऱया स्लिपमध्ये उभ्या विराट कोहलीकरवी झेलबाद झाला आणि न्यूझीलंडने पहिला बळी गमावला.

…अन् खेळ थांबला
न्यूझीलंडने 46. षटकांत 5 बाद 211 धावा केल्या असताना पावसाच्या व्यत्ययामुळे लढत थांबवण्यात आली. तेव्हा रॉस टेलर 67 धावांवर तर टॉम लॅथम तीन धावांवर खेळत होते. हार्दिक पांडय़ाने जेम्स निशामला 12 धावांवर तर भुवनेश्वर कुमारने कोलीन डी. ग्रॅण्डहोमला 16 धावांवर बाद केले. हिंदुस्थानकडून भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांडय़ा, रवींद्र जाडेजा व युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

पुन्हा चमकला
केन विल्यमसन याने वर्ल्ड कपमध्ये दिमाखदार कामगिरी केलीय. न्यूझीलंडने या लढतीआधीपर्यंत झळकावलेल्या एकूण धावांपैकी त्याने 31 टक्के धावा फटकावल्यात. या स्पर्धेत त्याचा स्ट्राईक रेट कमी आहे. संपूर्ण संघाचा भार त्याच्या खांद्यावर आहे म्हणून असेल कदाचित. याही लढतीत त्याने चमकदार फलंदाजी करीत अर्धशतकी खेळी केली. किवींच्या कर्णधाराने 95 चेंडूंत सहा चौकारांसह 67 धावांची खेळी साकारली. युजवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर तो रवींद्र जाडेजाकरवी झेलबाद झाला. या वेळी त्याने रॉस टेलरच्या साथीने 65 धावांची भागी केली.

संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड – निकोल्स त्रि.गो. जाडेजा 28, विल्यमसन झे. जाडेजा गो. चहल 67, टेलर खेळत आहे 67, अवांतर – 17, एकूण – 46.1 षटकांत 5 बाद 211. गोलंदाजी ः भुवनेश्वर 8.1-1-30-1, बुमराह 8-1-25-1.