हिंदुस्थानच्या दोन टीम आमने–सामने

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। लंडन

हिंदुस्थानी क्रिकेट संघाच्या वर्ल्ड कपमधील पराभवाचे आफ्टरशॉक्स बसायला सुरुवात झाली आहे. कर्णधार विराट कोहली व उपकर्णधार रोहित शर्मा या दोन दिग्गज खेळाडूंमध्ये संघाची विभागणी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून रोहित शर्मा कुटुंबासह मायदेशी परतल्यामुळे याची अधिकच चर्चा होऊ लागली आहे. तसेच काही खेळाडू हे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण यांच्या कामगिरीवर खूश नसल्याचेही कळतेय.

मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली‘ हे कधीकधी एकमेकांशी चर्चा न करता थेट निर्णय घेतात. त्यामुळे संघात गोंधळाचे वातावरण निर्माण होते. अंबाती रायुडूला डावलून विजय शंकरला संघात स्थान देण्यावरूनही असाच गोंधळ निर्माण झाला होता.

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलेली ‘टीम इंडिया’ रविवारी मायदेशी परतणार आहे. त्यानंतर संघाबरोबरच ‘बीसीसीआय’मध्येही बदलाचे संकेत मिळत आहेत. ‘टीम इंडिया’चा सपोर्ट स्टाफ आणि संघनिवड समितीमध्येही बदल बघायला मिळू शकतात. कोचिंग स्टाफ आणि संघनिवड समिती यांचा कार्यकालही तसा संपुष्टातच येणार आहे. 22 ऑक्टोबरला ‘बीसीसीआय’ची निवडणूक होणार आहे. त्यानंतर 23 सप्टेंबरपर्यंत ‘बीसीसीआय’च्या सर्व संलग्न राज्य संघटनांच्याही निवडणुका होणार असल्याने अनेक बदल होऊ शकतात.

विराट–शास्त्रीवर नाराज ,रोहित एकटाच मायदेशी परतला

मतभेद अन् खदखद
‘टीम इंडिया’त मतभेद आणि खदखद आहे. हिंदुस्थानी संघात विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यात दोन गट पडले आहेत, अशी माहिती ‘टीम इंडिया’तील एका खेळाडूने नाव न घेण्याच्या अटीवर एका संकेतस्थळाला दिली. एवढेच नव्हे तर तो खेळाडू म्हणाला, विराटच्या गटातील खेळाडूंना संघात सहज जागा मिळते. लोकेश राहुल फ्लॉप ठरतोय तरी त्याचा सलामीसाठी किंवा चौथ्या स्थानासाठी विचार होतो. नाहीतर किमान 15 जणांच्या संघात तरी राहुल आपले स्थान टिकवतोच. क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचाही कर्णधार विराट कोहलीला पाठिंबा असतो. आयपीएलमध्ये एकाच संघात खेळत असल्यामुळे युजवेंद्र चहल सध्या हिंदुस्थानी संघात असल्याचा आरोपही या खेळाडूने केला आहे.