अकोले ते लोणी किसान सभेचा लाँग मार्च सुरू, लाल वादळ महसूलमंत्र्यांच्या कार्यालयावर धडकणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी नगर जिल्ह्यातील अकोले येथून सायंकाळी सहा वाजता किसान सभेच्या लाँग मार्चला सुरुवात झाली. डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली निघालेले हे लाल वादळ शुक्रवारी (दि. 28) राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या लोणीतील कार्यालयावर धडकणार आहे. आज पोलिसांनी आंदोलकांना 149ची नोटीस बजावत लाँग मार्चला परवानगी नाकारली होती. मात्र, शेतकऱ्यांनी निर्धार कायम ठेवत लाँग मार्च काढला. दरम्यान, शेतकऱयांनी लाँग मार्च रद्द करावा, अशी भूमिका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मांडली आहे.

काय आहेत मागण्या?

अवकाळी पावसाने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागांत फळबागा मातीमोल झाल्या. मात्र, अजूनही शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. ही नुकसानभरपाई तातडीने द्यावी, अशी मागणी किसान सभेने केली आहे. त्याचबरोबर गायरान जमीन, दूध धोरण, दूध एफआरफी समितीचे न झालेले गठण, दूध आयातीला विरोध अशा अनेक मागण्यांसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला आहे.

पी. साईनाथ होणार सहभागी

अकोले ते लोणी या लाँग मार्चमध्ये पूर्णवेळ सहभागी होणार आहोत, अशी माहिती ‘मॅगसेसे पुरस्कार’ विजेते आणि जागतिक कीर्तीचे पत्रकार पी. साईनाथ यांनी दिली. अकोले पोलिसांकडून मोर्चेकऱ्यांना 149ची नोटीस बजावण्यात आली आहे.