
वय झाल्याने ज्यांचे लग्न जमत नाही, अशा मुलांना गाठायचे… त्यांच्याशी लग्न करायचे आणि दागिने, रोख रक्कम व किमती वस्तू घेऊन पोबारा करायचा.. अशा ‘डॉली की डोली’ या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. चित्रपटातील दृश्यालाही लाजवेल अशा ‘लुटेरी दुल्हन ‘ला तिच्या बनावट बापासह अटक केली असून तिने आतापर्यंत अशा प्रकारे पाच तरुणांना फसवून लूटमार केली आहे. नेहा खंडेलवाल (२२) असे लुटेरी दुल्हनचे व केसरीमल रांका (४५) हे बोगस वधुपित्याचे नाव असून दोघांचीही कसून चौकशी करण्यात येत आहे.
मीरा रोड पूर्वेतील शांती गार्डन परिसरात असलेल्या न्यू म्हाडा इमारतीमध्ये सेवलकुमार नाडर (५३) हा राहतो. काही कारणांमुळे त्याचे लग्न जुळत नव्हते. मध्यस्थी आरोपीने त्याची भेट घेऊन एक मुलगी लग्नाची आहे असे सांगितले. मुलीचे फोटोही सेवलकुमार याला पाठवले. लग्नाची बोलणी केली. प्रत्यक्ष लग्न लावून देण्यासाठी मध्यस्थीने ४४ हजार ७५० रुपये रोख स्वरुपात घेतले. त्यानंतर २६ जानेवारी रोजी नेहा खंडेलवाल व सेवलकुमार नाडर या दोघांचेही लग्न लावून दिले.
पाच ठिकाणी कारनामे
आपली फसवणूक झाल्याचे समजताच नवरदेवाने थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तपास करून नेहा खंडेलवार हिला अटक केली. ती मूळची अहिल्यानगरमधील साकूर या गावची आहे. तर ‘नकली बाप’ बनलेला केसरीमल रांका याच्याही मुसक्या आवळल्या असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे हे प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. ‘डॉली की डोली’ या टोळीने संगमनेर, जोगेश्वरी, बोरिवली, पाचोरासह पाच ठिकाणी अशाच प्रकारे कारनामो केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्याने सुखी संसाराची स्वप्ने बघितली पण…
लग्नाच्या वेळी नाशिकच्या देवळाली भागात राहणारा केसरीमल रांका (४५) हा बनावट बाप म्हणून हजर होता. त्यानेच हे लग्न जुळवण्यासाठी पुढाकार घेतला होता. लग्नसोहळा पार पडल्यानंतर नवरी मुलगी नेहा हिने आपला पती सेवलकुमार याचा विश्वास संपादन केला. उशिरा का होईना आपले लग्न जुळल्याने सेवलकुमार याने सुखी संसाराची स्वप्ने बघितली होती. पण या स्वप्नांचा काही तासांतच चक्काचूर झाला. नेहा हिने घरातील ४ लाख ७६ हजार रुपये किमतीचे दागिने, लॅपटॉप व अन्य मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा केला.

























































