
घराचे स्वप्न पाहणाऱयांसाठी खूशखबर आहे. कोकण मंडळाच्या सुमारे चार हजार घरांच्या सोडतीसाठी पुढील आठवडय़ात जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. सोडतीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून ठाण्यात 15 ते 44 लाख रुपयांत घराचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. म्हाडा सोडतीच्या नोंदणीला आणि पुणे मंडळाच्या 5990 घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री-स्वीकृतीला नुकतीच सुरुवात झाली आहे. त्यापाठोपाठ आता कोकण मंडळाची सोडत मार्गी लावण्याच्या हालचालींना वेग आला आहे. अंदाजे चार हजार घरांच्या सोडतीला तसेच घरांच्या किमतींच्या प्रस्तावास म्हाडा उपाध्यक्षांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. ही मंजुरी मिळताच पुढील आठवडय़ात अंदाजे घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज विक्री-स्वीकृतीस सुरुवात होईल.



























































