लोअर परळच्या व्यापारी मंडळाचे आज आंदोलन, दुकाने बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

लोअर परळ पूल दुरुस्तीच्या नावाखाली 173 दुकानदारांना रस्त्यावर आणण्याचा डाव पालिका प्रशासन करीत असल्याचा आरोप प्रो. दादासाहेब खामकर मंडई व्यापारी मंडळाने केला असून याविरोधात उद्या, 27 मार्च रोजी विभागातील बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी पालिकेचा निषेध करण्यासाठी आंदोलनही करण्यात येणार आहे.

लोअर परळ रेल्वे स्थानकाजवळील ना. म. जोशी मार्गावरील वरळीकडे जाणाऱ्या पुलाची दुरुस्ती पालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर पालिका अधिकाऱयांनी या ठिकाणच्या मंडईतील दुकानदारांना जागा रिकामी करण्याचे तोंडी आदेश दिल्याचे प्रो. दादासाहेब खामकर मंडई व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी सांगितले, मात्र यावेळी दुरुस्तीचा कोणताही आराखडा न दाखवता सरसकट जागा खाली करण्याची सक्ती केल्यास आमच्यावर उपासमार ओढावणार असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे आहे त्याच परिसरात पर्यायी जागा देण्यासंदर्भात लेखी आश्वासन द्या, अन्यथा जोरदार आंदोलन करू अशा इशाराही व्यापारी मंडळाच्या वतीने देण्यात आला आहे.

…तर 173 कुटुंबे रस्त्यावर

या पुलाजवळच्या प्रो. दादासाहेब खामकर मंडईत 173 दुकाने आहेत. यात 109 मासळी विक्रेते, 54 स्टॉलधारक, 18 मटण विक्रेते आणि 9 ओपन दुकानांचा समावेश आहे. गेल्या 40 वर्षांपासून या ठिकाणी ही दुकाने आहेत. दुकानांवरच या व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे अचानक व्यवसाय बंद झाल्यास 173 कुटुंबे रस्त्यावर येणार असल्याचे पाटील म्हणाले. आमचा शासकीय कामाला विरोध नाही, मात्र हे काम होताना आम्हालाही पर्यायी जागा द्यावी अशी मागणीही मंडळाच्या वतीने त्यांनी केली.