मोक्कातील फरारी म्होरक्यासह दोघांना अटक, खंडणी विरोधी पथक एकची कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खुनाच्या प्रयत्नासह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्यान्वये (मोक्का) कारवाईनंतर फरार असलेल्या टोळीच्या म्होरक्यासह दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक एकने अटक केली. सोन्या उर्फ राज रविंद्र भवार (22) आणि गौरव सुनिल कदम (22, दोघेही रा. धानोरी, विश्रांतवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याविरूद्ध विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, हत्यार बाळगणे, मोक्का तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.

खंडणी विरोधी पथक एक हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना मोक्कातील फरारी म्होरक्या चांदणी चौकात येणार असल्याची माहिती रविद्र फुलपगारे, प्रमोद सोनावणे आणि राजेंद्र लांडगे यांना मिळाली. पथकाने सापळा रचून सोन्या भवार याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदार अकलूजमध्ये असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पथकाने अकलूजमधून गौरव कदम याला ताब्यात घेतले.

ही कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार, अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक अजय वाघमारे, एपीआय अभिजीत पाटील, उपनिरीक्षक विकास जाधव, सयाजी चव्हाण, मधुकर तुपसौंदर, अमोल आवाड, प्रवीण ढमाळ, नितीन कांबळे यांनी केली.