माढा- निकृष्ट दर्जाच्या कामांवर शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा, तत्काळ कारवाई सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माढा येथील यावली सालसे राज्य मार्ग क्रमांक 202 निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात शिवसेनेने दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून घेतली गेली आहे.

शिवसेनेच्या मागण्यांवर तात्काळ कारवाई करून रस्त्यावरील विजेचे पोल, झाडे काढून टाकण्यात आले. तसेच रस्ता दुरुस्तीचे काम जलद गतीने होण्याची आश्वासन दिले आहे. माढा शहर शिवसेनेने या बाबतीत आवाज उठवून प्रश्न मार्गी लावल्याने नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे

राज्य मार्ग क्रमांक 202 यावली ते सालसे राज्य मार्गाचे रस्ता विकासाचे काम दुरुस्ती सुरू आहे. या कामाला विलंब लागत आहे. त्याचा माढा शहर शिवसेनाने रस्ता रुंदीकरणात आढळून येत असलेली तफावत तसेच होणाऱ्या निकृष्ट दर्जाचे काम आणि कामाला होणारा विलंब या संदर्भात तहसीलदार यांना निवेदन देऊन 5 नोव्हेंबरला रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला होता.

राज्य मार्ग 202 यावली ते सालसेचे रस्ता रुंदीकरण व दुरुस्तीचे काम गेल्या वर्षभरापासून चालू आहे. माढा शहरात प्रवेश केल्यावर रस्त्याच्या रुंदीकरण करताना तफावत आढळत असल्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिले होते.

तसेच काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत ठेकेदाराने शिवाजी चौकातील जुन्याच पुलावरून काँक्रीटीकरण केले असल्याने त्यांच्या दर्जा बाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. काम अतिशय संथ गतीने होत असल्याने नागरिकांना खोदलेल्या रस्त्याच्या फटका वाहतूक व्यवस्थेवर पडत असून नागरिकांनाही समस्येला तोंड द्यावे लागत आहे.

तसेच रस्ता रुंदीकरण करताना विजेचे खांब तसेच ठेवण्यात आले होते. रस्त्यावर असलेली झाडेही तशीच ठेवून रुंदीकरण केले जात होते. या सर्व प्रश्नांबाबत माढा शहर शिवसेनेचे शहर प्रमुख शंभू साठे यांच्या नेतृत्वाखाली आवाज उठवला होता. त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कारवाई करत विजेचे पोल व रस्त्यावरील झाडे बाजूला करण्यात येत आहेत. तसेच येथून पुढे काम रस्ता हद्द निश्चित करून जलद गतीने होईल असे आश्वासन देण्यात आले.