
जगज्जेतेपदाच्या लढतीत आपल्याला रस नसल्याचे स्पष्ट करीत नॉर्वेचा विश्वविजेता बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसनने ग्रँडमास्टर इयान नेपोमनिशीविरुद्ध पुढील वर्षी सामना न खेळण्याचा निर्णय बुधवारी घेतला. त्यामुळे आव्हानवीर स्पर्धेतील विजेत्या नेपोमनिशीला जागतिक अजिंक्यपदासाठी उपविजेत्या ग्रँडमास्टर डिंग लिरेनशी सामना करावा लागणार आहे. मला जगज्जेतेपदाच्या सामन्यात रस नसला तरी मी खेळ अद्याप सोडलेला नाही, असे कार्लसनने स्पष्ट केले.
“मी ‘फिडे’ आणि माझ्या चमूसह इयानसमवेत चर्चा केली आहे. मला जगज्जेतेपदाच्या सामन्यातून काही साध्य होईल असे वाटत नाही. ऐतिहासिक कारणास्तव सामना मनोरंजक असेल याची मला खात्री असली तरी माझा खेळण्याचा कोणताही विचार नाही आणि मी सामना खेळणार नाही,’’ असे पाच वेळा जगज्जेत्या कार्लसनने सांगितले. डिसेंबर 2021 मध्ये दुबई येथे जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कार्लसनने नेपोमनिशीला 7.5-3.5 असे पराभूत करीत पाचव्यांदा जगज्जेतेपद प्राप्त केले होते. यंदा नेपोमनिशी माद्रिद येथे झालेल्या आव्हानवीर स्पर्धेत जेतेपद मिळवत जगज्जेतेपदाच्या लढतीसाठी सज्ज झाला होता, पण कार्लसनच्या माघारीमुळे त्याला उपविजेत्या लिरेनविरुद्धच्या लढतीत झुंझावे लागेल.
‘मला असे वाटते की, मला आता काही मिळण्यासारखे राहिले नाही. याबाबत मी माझ्या टीमशी, जागतिक बुद्धिबळ महासंघ आणि इयानशी चर्चा केली आहे. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत मी सामना खेळणार नाही. अर्थात स्पर्धेतून माघार घेतली तरी इतक्यात निवृत्तीचा विचार मी केलेला नाहीय.’
– मॅग्नस कार्लसन, पाच वेळचा बुद्धिबळ जगज्जेता































































