महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भाजपकडून सातत्याने होणारा अवमान, सीमाप्रश्नी कन्नडीगांची सुरू असलेली दंडेलशाही, याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून शनिवारी (दि. 10) कोल्हापुरात निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. अरे ला कारे करण्यात कोल्हापूरकर कमी नाहीत, पण सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी हे आंदोलन होणार आहे. दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्र सीमाबांधवांच्या पाठीशी ठाम असल्याचे कर्नाटकला ठणकावून सांगणार असल्याचेही महाविकास आघाडीच्या कोल्हापुरातील नेत्यांकडून यावेळी सांगण्यात आले.
राज्यपाल कोश्यारी, भाजपचे प्रवक्ते, मंत्री, आमदारांकडून छत्रपती शिवरायांचा वारंवार अवमान करण्यात येत आहे. त्यानंतर लगेचच कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून महाराष्ट्रातील गावांवर दावा करणारी वक्तव्ये झाली. तसेच, महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवू देणार नाही, असा दम भरला. त्यातच मंगळवारी बेळगावात महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ले झाले. याचे संतप्त पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटकला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी तसेच सीमाबांधवांच्या पाठीशी ठाम राहण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या कोल्हापुरातील पदाधिकाऱयांची बैठक झाली. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, जिल्हाप्रमुख विजय देवणे, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव उपस्थित होते. यावेळी शनिवारी निषेध आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला.
बोम्मई सरकारची ब्रिटिशांसारखी राजवट – हसन मुश्रीफ
हसन मुश्रीफ म्हणाले, ब्रिटिशांपेक्षा मोठी राजवट असल्यासारखे बोम्मई सरकार वागत आहे. सीमाभागात मराठी भाषिकांचा छळ करत आहेत. महाजन आयोग सदोष असता, तर सुप्रीम कोर्टाने सीमाबांधवांची याचिका दाखल करून घेतली नसती. त्यामुळे भांडण लावून संघर्ष करण्याचा प्रयत्न बोम्मई करत आहेत. कर्नाटकात पुन्हा भाजपचे सरकार येणार नसल्याने येणारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सीमाप्रश्न चिघळवत ठेवण्याचा प्रयत्न बोम्मई करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आणि राज्याभिषेक कोठे झाला हे आमदार प्रसाद लाड यांना माहीत नाही, असे नाही. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडूनही महाराजांचा एकेरी उल्लेख म्हणजे हे सर्व षडयंत्र असल्याचेही मुश्रीफ यांनी निदर्शनास आणले.
राज्यपालांच्या बैठकीनंतरच सीमावाद सुरू – सतेज पाटील
सतेज पाटील म्हणाले, कोल्हापुरात महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील राज्यपालांची बैठक झाली. या बैठकीनंतरच महाराष्ट्र-कर्नाटक वाद सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे राज्यपालांच्या या बैठकीतून केंद्र सरकारला पाठवण्यात आलेला मसुदा जनतेसमोर आला पाहिजे. दोन वेळा सीमाभागात जाण्यासाठी जाहीर केलेला दौरा मंत्र्यांनी रद्द केला, पण पुन्हा कधी जाणार, याची तारीख जाहीर केली नसल्याची टीकाही त्यांनी केली.
भाजप नेत्यांची डोकी तपासून घेतली पाहिजेत – विजय देवणे
आम्हीदेखील कर्नाटकला जाणारे पाणी थांबवू शकतो; पण आम्हाला राजकारण करायचे नाही. कर्नाटक आणि त्यांच्या ‘कन्नड रक्षण वेदिके’च्या गुंडांना ‘हटाव लुंगी आणि बजाओ पुंगी’प्रमाणे आंदोलन करून हिसका दाखवणे गरजेचे असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे म्हणाले. महाराष्ट्रातील आंदोलनाबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांची वक्तव्ये पाहता भाजप नेत्यांची डोकी तपासून घेतली पाहिजे, अशी टीकाही त्यांनी केली.
…तर दगड हातात घेऊ – संजय पवार
छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात आजवर कधीही अवमान झाला नाही, असे सांगून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार म्हणाले, कोश्यारी हे नाव घेण्याच्याही लायकीचे नाही. राज्यपालांकडून छत्रपती शिवरायांचा अवमान झाला, तरीही शिवसेनेसोबत गद्दारी करून गेलेलेही गप्प बसले आहेत, ही शरमेची बाब आहे. तसेच, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई रोज वादग्रस्त वक्तव्ये करत आहेत. सीमाभागात जायचेच नव्हते तर चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई या मंत्र्यांनी तशी घोषणा केलीच कशाला? यामुळे मराठी माणसाचे खच्चीकरण झाले आहे. सीमाभागात ‘कन्नड रक्षण वेदिके’च्या गुंडांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. याबाबत ‘तुम्ही आमची 50 वाहने फोडली, तर आम्ही तुमची 100 वाहने फोडू, तुम्ही वीट घेतली, तर आम्ही दगड घेऊ,’ असा इशारा संजय पवार यांनी दिला.


























































