
महाड इमारत दुर्घटनेला 36 तास झाले. इमारत कोसळून मातीचा, शिगांचा ढिगारा साचलेला, ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह असा कठीण प्रसंग होता. पोकलन चालक किशोर भागवत लोखंडे या चोवीस वर्षीय तरुणाने कठीण प्रसंग असताना ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नऊ जणांना काढले. यामध्ये 8 मृतदेह काढले असून एक चार वर्षीय मोहमद भांगी या बालकाला सुखरूप काढण्यात किशोरचा मोलाचा वाटा आहे. दुर्घटनेपासून किशोर सलग 36 तास अहोरात्र ढिगारा हटविण्याचे काम करत होता.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील उखंडा लिंबडेवी हे किशोर लोखंडे याचे गाव. किशोर हा मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरण सुरू असलेल्या कामात एल अँड टी कंपनीच्या पोकलनवर चालक म्हणून काम करीत आहे. पाच वर्षापासून तो पोकलन चालक म्हणून काम करीत आहे. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी काजळपुरा येथील तारिक गार्डन ही इमारत पत्यासारखी कोसळली. तातडीने किशोर याला कंपनीने पोकलन घेऊन दुर्घटना घटनास्थळी पाठविण्यात आले. त्यानंतर किशोर हा 24 ऑगस्टच्या सायंकाळ पासून आतापर्यत पोकलन चालविण्याचे काम दिवसरात्र करीत आहे.
मातीचा ढिगारा उपसताना खाली अडकलेले व्यक्तींना कोणतीही इजा होऊ नये याची खबरदारी घेऊन किशोर हा पोकलनमार्फत काम करीत होता. खाण्या पिण्याची भ्रांत न ठेवता किशोरने सलग 36 तास बचाव कार्य सुरू ठेवले. ढिगाऱ्या खाली अडकलेला मोहमद भांगी हा जिवंत असल्याचे समजल्यावर त्याच्या बाजूला असलेला ढिगारा सावकाशपणे काढून बाहेर काढण्याचा त्याचा मार्ग किशोर याने मोकळा करून दिला. त्यानंतर या बालकास सुखरूप बाहेर काढण्यात आले.
मोहमद भांगी या बालकास काढण्यात प्रशासनाला यश आले असले तरी किशोर लोखंडे याचाही या यशात मोलाचा वाटा आहे. किशोरचे काम हे अहोरात्र काम सुरू आहे मात्र तरीही मुलाला वाचविल्याचे समाधान किशोरच्या चेहऱ्यावर खुलून दिसत आहे.





























































