
आठ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत आले, त्यावेळी दरवर्षी 2 कोटी नोकऱया देण्याचे आश्वासन दिले होते. त्याच प्रमाणे आता 10 लाख नोकऱया देण्याचे आश्वासन दिले आहे. हे जुमला सरकार नाही, तर ‘महाजुमला सरकार’ आहे, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी मोदी सरकारच्या घोषणाबाजीवर घणाघाती टीका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांना पुढील दीड वर्षात ‘मिशन मोड’वर 10 लाख सरकारी नोकऱया उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधानांच्या या नव्या घोषणेवर राहुल गांधी यांनी ट्विट करीत टीका केली. त्यांनी मोदी सरकारला जुन्या आश्वासनांची आठवण करून दिली.
‘नौ सौ चूँहे खाकर बिल्ली हज को चली’
काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीदेखील पंतप्रधानांच्या घोषणेवर जोरदार निशाणा साधला. सरकारी नोकऱयांसंबंधी पंतप्रधान मोदींनी केलेली घोषणा म्हणजे ‘नौ सौ चूँहे खाकर बिल्ली हज को चली’ असा प्रकार आहे. देशात 50 वर्षांतील सर्वात भीषण बेरोजगारी आहे. रुपयाने 75 वर्षांतील निच्चांकी तळ गाठला आहे. असे असताना पंतप्रधान ‘ट्विटर, ट्विटर’ खेळून आणखी किती वर्षे देशाची दिशाभूल करणार आहेत, असा सडेतोड सवाल सुरजेवाला यांनी मंगळवारी केला.
























































