
‘माझी महालक्ष्मी’चे आकर्षक शिल्प, सायकल ट्रॅक, दिशादर्शक फलक, जंक्शनचे सौंदर्यीकरण अशी कामे नेहमीच गजबजलेले असणाऱया महालक्ष्मी स्टेशन आणि परिसरात होणार आहेत. त्यामुळे महालक्ष्मी स्टेशन आणि परिसराचे रुपडे पालटणार आहे. या कामासाठी पालिका 90 लाख रुपयांचा खर्च करणार आहे.
मुंबईला स्वच्छ-सुंदर बनवण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून संपूर्ण मुंबईत रस्ते, पदपथ, वाहतूक बेटांच्या सौंदर्यीकरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. संपूर्ण मुंबईसाठी 1700 कोटींच्या खर्चाचे नियोजनही करण्यात येणार आहे. यात या वर्षी डिसेंबरअखेरपर्यंत 50 टक्के तर मार्च 2023पर्यंत उर्वरीत 50 टक्के सौंदर्यीकरणाची कामे केली जाणार आहेत. यात पश्चिम रेल्वे मार्गावरील महालक्ष्मी स्थानक आणि परिसराचा कायापालट केला जाणार आहे. महालक्ष्मी हे महत्त्वाचे स्थानक असून महालक्ष्मी मंदिर, वरळी नेहरू तारांगण, हाजी अली दर्गा या ठिकाणी येणाऱया पर्यटकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असते. तसेच महालक्ष्मी परिसरात कॉर्पेरेट कार्यालये असून रोज शेकडो प्रवासी महालक्ष्मी स्थानकातून ये-जा करतात.
प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महालक्ष्मी स्थानक व परिसरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार असून यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून मार्च 2023 अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
असे काम होणार
महालक्ष्मी स्थानक परिसरात सायकल ट्रक
प्रवाशांसह ये-जा करणाऱयांना बसण्यासाठी बेंच
कुठला रस्ता कुठे जातो दिशादर्शक फलक
स्थानक परिसरातील जंक्शनचे सौंदर्यीकरण
‘माझी महालक्ष्मी’ शिल्प तयार करणार




























































