पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार

सामना ऑनलाईन, मुंबई

राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्टपणे सांगितले. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारापूर्वी पालकमंत्र्यांच्या नव्याने नियुक्त्या केल्या आहेत. पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील तर जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी गिरीश महाजन यांच्यावर सोपवली आहे.

राज्यस्तरीय खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आयोजित बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलत होते. पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रश्नांनी भंडावून सोडले, पण खरीप हंगाम पूर्वतयारीची बैठक असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी राजकीय प्रश्नांवर उत्तर देण्यास नकार दिला. पण मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारले असता अखेरीस पावसाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार निश्चितपणे करणार, असे सांगितले.

नवीन पालकमंत्री जाहीर

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे त्यांच्याकडील अन्न व नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपवला आहे. गिरीश बापट हे पुण्याचे पालकमंत्रीदेखील होते. पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी  चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविली आहे. तर संसदीय कार्यमंत्री पदाची जबाबदारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर दिली आहे, तर जळगावचे पालकमंत्री म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी दिली आहे.