
महाराष्ट्रातून येणाऱ्या आमच्या नेत्यांची अडवणूक करू नका या मागणीसाठी निवेदन घेऊन, बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेल्या मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळालाच ताब्यात घेण्यात आल्याने, पुन्हा एकदा सीमा भागात मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
सीमाभागातील मराठी भाषिकांशी समन्वय साधण्यासाठी महाराष्ट्रातील सीमाभाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराजे देसाई हे आज बेळगाव येथे येणार होते.पण मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सूचनेनुसार कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून महाराष्ट्राच्या या मंत्र्यांना बेळगाव जिल्ह्याच्या हद्दीत येण्यापासून दुसऱ्यांदा रोखले.
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून येणाऱ्या आमच्या नेत्यांची अडवणूक करू नका या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गेले असता, पोलिसांनी ताब्यात घेतले. कलम 144 लागू असताना अशाप्रकारे निवेदन देण्यासाठी इतक्या मोठ्या संख्येने जमणे चुकीचे असल्याची भूमिका पोलिसांनी घेतली.
यावेळी पोलिसांच्या आदेशाला नजुमानता बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर भालकी सहसंयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणा देत निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाकडे जाणाऱ्या समितीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली.





























































