ऑनर किलिंगने नांदेड जिल्हा हादरला, प्रेमसंबंध मान्य नसल्याने कुटुंबानेच केली डॉक्टर मुलीची हत्या,

प्रेमसंबंधाला असलेल्या विरोधातून आई-वडील, भावांनी मिळून एका डॉक्टर तरुणीची रुमालाने गळा आवळून हत्या केली. मृतदेह शेतात नेऊन जाळला आणि राख नदीत फेकून दिली. चार दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली. ऑनर किलिंगच्या या भयंकर घटनेने नांदेड जिल्हा हादरला असून, या प्रकरणी पोलिसांनी आई-वडिलांसह दोन भाऊ, मामाला अटक केली आहे.

नांदेड तालुक्यातील महिपाल पिंपरी येथील शुभांगी जनार्दन जोगदंड (22) ही तरुणी शहरातील आयुर्वेदिक महाविद्यालयात बीएएमएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकत होती. पंधरा दिवसांपूर्वीच तिचा विवाह जुळला होता. परंतु, शुभांगीचे गावातीलच अमोल बळीराम कदम याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड झाल्याने हे लग्न मोडले. मुलीची सोयरीक मोडल्यामुळे गावात बदनामी झाल्याचा राग जोगदंड कुटुंबाला होता. शुभांगीचे वडील जनार्दन लिंबाजी जोगदंड यांनी मेहुणा केशव शिवाजी कदम, पुतणे गिरीधारी शेषराव जोगदंड, गोविंद केशवराव जोगदंड आणि मुलगा कृष्णा यांच्या मदतीने 22 जानेवारी रोजी रात्री दहा ते अकराच्या दरम्यान घरातच शुभांगीचा गळा रुमालाने आवळला. मृतदेह खताच्या पोत्यात टाकून मोटारसायकलवरून शेतात नेला. तेथे मृतदेह जाळून दुसऱ्या दिवशी पहाटे मृतदेहाची राख जवळच्या नदीत फेकून दिली.