
जालना येथील जिल्हा महिला व बाल रुग्णालयाच्या डॉक्टरांनी अतिशय अडथळ्यांची ठरलेल्या एका महिलेची प्रसूती 10 सप्टेंबर रोजी यशस्वीपणे केली आहे. ‘3 इडियट्स’ या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे अगदी त्याच पद्धतीने डॉक्टरांनी व्हेंटुस व्हॅक्यूमच्या मदतीने प्रसूती करून आई व बाळ दोघांचेही प्राण वाचविले आहेत. तब्बल 17 डॉक्टरांनी केलेल्या या प्रसूतीला यश आलं आहे. या प्रसूती पूर्णपणे यशस्वी झाल्यानं महिलेसह बाळाची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.
घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव येथील महिला गोदा सुंदरलाल गुढेकर यांना नातेवाईकांनी महिला व बाल रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केले होते. डॉक्टरांनी तपासले असता सदरील महिलेची अवस्था अतिशय नाजूक होती. नैसर्गिकरित्या प्रसूती होणे अशक्य होते. पण या महिलेला कायपोस्कोलिओ हा आजार आहे. हा आजार असल्यानं गोदा यांचा पाठीचा मणका वाकडा आहे. शिवाय गर्भाशयात बाळाला आवश्यक तेवढी जागा मिळाली नाही. त्यामुळे अशा रुग्णांची प्रसूती करणं डॉक्टरांसमोर मोठं आव्हान असतं. शिवाय प्रसूतीसाठी आलेल्या महिलांच्या शरीरात प्लेटलेट्सही फक्त 62 हजार इतक्याच असल्यानं प्रसूती नॉर्मल आणि सीझर करणं देखील मोठं आव्हान होतं. याशिवाय भूल देताना देखील एक आव्हान बनलं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी व्हेंटुस व्हॅक्यूमच्या मदतीने प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. सदरील महिलेची डॉक्टरांनी व्हेंटुस व्हॅक्यूमच्या मदतीने यशस्वीपणे प्रसूती केली आहे. प्रसूतीनंतर बाळाचे वजन 2.7 किलो असून बाळ व आई दोघेही सुखरूप असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
सदरील प्रसूती महिला व बाल रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजेंद्र पाटील, डॉ. आर. एस. गौळ , डॉ. अमोल लोंढे, डॉ. प्रीती राठोड, डॉ. लाखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. कृष्णा वानखेडे, डॉ. लीना चव्हाण, डॉ. शीतल, डॉ. फायका, इनचार्ज परीचारिका पवार व इतर परिचारिका व कर्मचारी यांनी केली.
सिझेरियन करणे देखील कठीण होते
सदरील महिलेस दवाखान्यात भरती केले तेव्हा अतिशय किचकट परिस्थिती होती. नैसर्गिक प्रसूती होणे अशक्य होते. तसेच महिलेच्या रक्तातील पेशीची संख्या कमी असल्याने सिझेरियन करणे देखील कठीण होते. बाळ बाहेर येण्यास अडथळा निर्माण झाल्याने वैद्यकीय पथकाने व्हेंटुस व्हॅक्यूमच्या मदतीने प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सदरील महिलेची व्हेंटुस व्हॅक्यूमच्या मदतीने यशस्वीपणे प्रसूती करण्यात आली. आई व बाळ दोघेही सुखरूप असल्याची माहिती जालना जिल्हा महिला व बाल रुग्णालय अधीक्षक डॉ. राजेंद्र पाटील यांनी दिली.
बाळ दोघांचीही तब्येत व्यवस्थित
सदरील महिलेस रुग्णालयात दाखल केले असता तपासून सुरुवातीला आम्ही सिझेरियन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, महिलेची रक्त तपासणी केली असता पेशींची संख्या कमी आढळून आली. त्यामुळे महिलेची व्हेंटुस व्हॅक्यूमच्या मदतीने प्रसूती करण्याचे ठरवले. महिलेची व्हेंटुस व्हॅक्यूमच्या मदतीने प्रसूती करण्यात आली. बाळाचे वजन 2.7 किलो असून आई व बाळ दोघांचीही तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती जालन्याच्या महिला व बाल रुग्णालयाच्या प्रसूती तज्ज्ञ डॉ. प्रीती राठोड यांनी दिली.


































































