सरकारचे दूध संघांना अनुदान, दुधाला २५ रुपये दर मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नागपूर

दुधाला योग्य दर देण्यासाठी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने दुधाला २५ रुपये प्रतिलिटर खरेदी दर मान्य केला आहे. सरकारचे अनुदान घेणाऱ्या सर्व दूध संघांनी २५ रुपये दराने शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करावे असे आवाहन सरकारने केले आहे. ही नकीन दरवााढ उद्यापासून (२१ जुलैपासून) लागू होईल. मात्र जे दूध उत्पादक शेतकरी भुकटीच्या अनुदानाचा लाभ घेतील त्यांना याचा लाभ मिळणार नाही असे बैठकीनंतर सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी रामगिरी निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तब्बल दोन तास झालेल्या बैठकीनंतर राजू शेट्टी यांनी दूध आंदोलन मागे घेत असल्याचे जाहीर केले. दूध आंदोलनाबाबत राज्य सरकारचा निर्णय सकारात्मक आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. पण जाहीर केलेले पैसे शेतकऱ्यांना मिळावेत, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. आम्ही प्रसंगी सरकारशी भांडतो, मात्र दूध दराबाबतच्या निर्णयाचे मोठय़ा दिलाने स्वागत करतो अणि या क्षणापासून दूध आंदोलन मागे घेतो, असे राजू शेट्टी यांनी जाहीर केले.

विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विधान भवनात बैठक पार पडली.

सहकारी आणि खासगी दूध संघांच्या प्रतिनिधींनी एकमताने दुधाचा खरेदी दर २५ रुपये इतका मान्य केला, परंतु शेतकऱ्यांना थेट लिटरला पाच रुपये अनुदान देण्याची मागणी अमान्य करण्यात आली. शेतकऱ्यांऐवजी खासगी, सहकारी दूध संघांना अनुदान दिले जाणार आहे.

१० जुलैच्या निर्णयाप्रमाणे दूध निर्यातीसाठी प्रतिलिटर पाच रुपये तर दूध भुकटीकरिता प्रतिकिलो ५०रुपये अनुदान दिले जाईल, मात्र दूध पुरवठा करणारी संस्था किंवा दूध रूपांतरण करणारी संस्था यापैकी एका संस्थेला अनुदान लागू असेल. पिशवीबंद दुधासाठी हे अनुदान लागू राहणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.