अमरावतीत भाजपने 50 कोटी देऊन निकाल फिरवण्याचा प्रयत्न केला, नाना पटोले यांचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपकडून 50 कोटी रुपये देऊन निवडणुकीचा निकाल फिरवण्यात येणार होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज केला पण आपण आयुक्तांना याची माहिती दिल्यामुळे हा सर्व प्रकार टळल्याचे नाना पटोले म्हणाले.

प्रदेश काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना नाना पटोले यांनी हा गौप्यस्फोट केला. अमरावतीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी सर्वाधिक मते घेतली होती, पण निकाल थांबवण्यात आला होता. त्यांना विजयी करण्यात येत नव्हते. कारण 50 कोटी रुपये आणि वेळ पडल्यास 100 कोटी रुपये देऊन अमरावतीमधील हा निकाल फिरवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती गुप्तचर विभागातील माझ्या मित्राने मला माहिती दिली. निवडणुकीतील मते इकडे तिकडे करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही गुप्तचर खात्यातील मित्राने सांगितले. त्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो. ही माहिती समजल्यावर मी अनेकांना पह्न केले, आयुक्तांनाही पह्न केला. निकाल फिरवण्याचा प्रयत्न झाला तर तुमची नोकरी जाईल, असा इशारा आयुक्तांना दिला.

विजयी उमेदवार धीरज लिंगाडे यांना प्रमाणपत्र घेऊन बाहेर पड नाही तर तुलाही बघेन, अशा शब्दांत सुनावले. कधी कधी अशीही दादागिरी करावी लागते, असे नाना पटोले यांनी बैठकीला उपस्थित असलेल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.