LIVE- शिक्षक, पदवीधर मतदारसंघ निवडणूक; नाशकात शिवसेनेचे दराडे आघाडीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी  नेरूळ येथील आगरी-कोळी सांस्कृतिक भवनात सुरू आहे. तर नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी अंबड औद्योगिक वसाहतीतील सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन येथे होईल. निवडणूक आयोगाने त्याची कडेकोट तयारी केली असून नेरूळ येथील मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या चारही मतदारसंघांच्या निवडणूक रिंगणात असलेल्या ५२ उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार असून शिक्षक, पदवीधरांचे आमदार कोण ते काही वेळात ठरणार आहे. या निवडणुकीसाठी होत असलेल्या मतमोजणीचे लाईव्ह अपडेटस पुढील प्रमाणे आहेत.

मुंबई पदवीधर मतदार संघ : शिवसेनेचे विलास पोतनीस यांची बाजी

  • मुंबई शिक्षक मतदारसंघातून लोकभारतीचे कपिल पाटील यांचा ४०५० मतांनी विजय झाला आहे.
  • नाशिक शिक्षक मतदार संघाची दुसरी फेरी पूर्ण झाली आहे. ४० हजार मते मोजून पूर्ण झाली असून शिवसेनेचे शिवाजीराव दराडे यांना आतापर्यंत १४,००० मते मिळाली आहे.
  • कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी आगरी-कोळी सांस्कृतिक भवनाच्या दुसऱ्या मजल्यावर होणार.
  • कोकण पदवीधरसाठी २८ टेबल मांडण्यात आले असून मतमोजणीचे सहा राऊंड होणार.
  • मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी १४ टेबल मांडण्यात आले आहेत. ही मतमोजणी अडीच राऊंडमध्ये संपेल.
  • पहिल्या मजल्यावर मुंबई पदवीधरची मतमोजणी होईल. या मतमोजणीसाठी २० टेबल मांडण्यात आले असून चार राऊंडमध्ये मतमोजणी होणार.
  • मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस, भाजपचे अॅड. अमितकुमार मेहता, शेकापचे राजेंद्र दराडे उभे आहेत.
  • कोकण पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार व ठाण्याचे माजी महापौर संजय मोरे यांच्यासमोर भाजपचे राष्ट्रवादीतून आयात केलेले उमेदवार निरंजन डावखरे आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला उभे आहेत.
  • मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांच्याविरोधात लोकभारतीचे कपिल पाटील व भाजप पुरस्कृत अनिल देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
  • नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेचे किशोर दराडे यांच्याविरोधात भाजपचे अनिकेत पाटील, माजी खासदार प्रताप सोनवणे आणि संदीप बेडसे यांच्यात लढत आहे.
  • सोमवारी, २५ जून रोजी या चारही मतदारसंघांसाठी मतदान झाले होते.
  • मुंबई पदवीधर मतदारसंघात ५३.३९ % मतदान झाले आहे.
  • मुंबई शिक्षक मतदारसंघात ८३.२५ % मतदान झाले
  • कोकण पदवीधर मतदारसंघात ७३.८९ % मतदान झाले
  • नाशिक शिक्षक मतदारसंघात ९२.३० % इतके घसघशीत मतदान झाले.

मतमोजणी केंद्राकडे येणारे सर्व रस्ते बंद

मतमोजणीच्या कालावधीत आगरी-कोळी सांस्कृतिक भवनाकडे येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. मतदान केंद्राच्या मागे असलेल्या मैदानावर वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

नवी मुंबईत ड्राय डे

या तिन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीची मतमोजणी नेरूळ येथे होत असल्याने आज संपूर्ण नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबईसह पनवेल, उरण परिसरातील देशी दारूची दुकाने, वाईन शॉप आणि बार बंद राहणार आहेत.

मराठी, रोमन अंकात मत दिले तरी वैध

मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर आणि कोकण पदवीधर या तिन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीचे मतदान पसंतीच्या क्रमानुसार झाले आहे. मतदारांनी पसंती क्रमांक देण्यासाठी इंग्रजी अंकाचा उपयोग करावा असा प्रचार झाला होता. मात्र जर काही मतदारांनी मराठी आणि रोमन अंकामधून पसंती क्रमांक दिला असेल तर ती मतपत्रिका वैध असणार आहे. मात्र एक पसंती क्रमांक मराठीतून आणि दुसरा इंग्रजीतून असेल तर ती मतपत्रिका बाद ठरणार आहे, असे निवडणूक अधिकाऱयांनी मतमोजणी प्रतिनिधींच्या बैठकीत सांगितले.