मुंबई : शिवसेनेच्या पोतनीसांचा विजय निश्चित, औपचारिक घोषणा बाकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

विधानपरिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि मुंबई शिक्षक मतदार संघासाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये शिवसेनेचे उमेदवार आघाडीवर आहेत. मुंबई पदवीधर मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी आतापर्यंत १९,३५४ मते मिळवली असून त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी अॅड. अमितकुमार मेहता यांना ७,७९२ मतं मिळाल्याने विलास पोतनीस यांचा विजय निश्चित असून औपचारिक घोषणा बाकी आहे.

मुंबई शिक्षक मतदार संघातून उभे असलेले लोकभारतीचे कपिल पाटील यांना ३,९५१ मते मिळाली असून त्यांच्याही विजयाची औपचारिक घोषणा बाकी आहे. तर कोकण पदवीधर मतदार संघातून शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे आणि भाजपचे निरंजन डावखरे यांच्यात कडवी लढत सुरू असून दुसऱ्या फेरीची मतमोजणी सुरू आहे.

नाशिक शिक्षक मतदार संघाची दुसरी फेरी पूर्ण झाली आहे. ४० हजार मते मोजून पूर्ण झाली असून शिवसेनेचे शिवाजीराव दराडे यांना आतापर्यंत १४,००० मते मिळाली आहे, त्यांचे प्रतिस्पर्धी संदीप बेडसे यांना ८२०० मते, भाजपचे अनिकेत पाटील यांना ४,७०० मते, आप्पासाहेब पाटील यांना २९०० मते आणि भीरूड यांना २४०० मते मिळाली आहेत.