
शिवसेनेशी गद्दारी करून भाजपाशी साथसंगत करून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद मिळवले असले तरी, त्यांच्या सरकारचा पाय दिवसेंदिवस खोलातच चालला आहे. महाराष्टात सीमावाद, छत्रपती शिवाजी महाराजांचा दिवसेंदिवस सरकारपक्षाकडून होत असलेला अपमान, राज्यातले उद्योग इतर राज्यांत जात असल्याने सरकारबद्दल जनमानसांत विपरित प्रतिमा निर्माण होत आहे त्याचबरोबर भाजपा लोकप्रतिनिधी व कार्यकरत्यांशी शिंदे गटाचे नेते करत असलेल्या अरेरावीमुळे भाजपाचे श्रेष्ठाr या सरकारवर नाराज असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल भाजपाचे संघटन सचिव बी.एल. संतोष यांनी तडकाफडकी बोलावून घेत, आपली नाराजी त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखविल्याचे सूत्रांनी सांगितले. एकनाथ शिंदे हे भाजपाचे पदाधिकारी नसतानाही, भाजपाच्या संघटनसचिवांनी मुख्यमंत्र्यांना बोलावून कानपिचक्या दिल्याने त्याला राजकीय वर्तुळात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
महाराष्टातील सरकारच्या कामगिरीबाबत दिल्लीतील भाजपा नेत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. महाराष्टातील सरकार हे महाराष्ट्रद्रोही आहे, अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. ही प्रतिमा आगामी निवडणूकांसाठी केवळ सरकारसाठीच नाही तर, भाजपासाठी धोक्याची ठरणार आहे.
वेगळ्या गटासाठी धडपड
शिवेसना पक्ष आणि निवडणूक चिन्ह हा विषय न्यायप्रविष्ट आणि निवडणूक आयोगाकडे प्रलंबित असतानाही शिंदे गटाला वेगळ्या गटाचा दर्जा मिळविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धडपड करावी लागत आहे. संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन आपले गा-हाणे त्यांच्यापुढे मांडल्याचे सूत्रांनी सांगितले.



























































