महाराष्ट्र एसटी कामगार सेनेची ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या परिवारास मदत; कुटुंबीयांकडे धनादेश सुपूर्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एसटी महामंडळातील आत्महत्या करणाऱ्या ‘त्या’ दोघा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र एसटी कामगार सेनेने सांत्वन करणारी भेट देऊन दोघांच्या परिवारास प्रत्येकी 1 लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द केला आहे. एसटी महामंडळातील जळगाव व बीड विभागातील अनुक्रमे वाहक मनोज अनिल चौधरी आणि चालक कम वाहक पांडुरंग संभाजी गडदे यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले होते.

एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष खासदार अरविंद सावंत यांच्या आदेशानूसार सरचिटणीस हिरेन रेडकर यांच्या नेतृत्वाखाली एसटीच्या कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ‘त्या’ शोकमग्न कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तसेच कुटुंबियांना एक लाख रूपयांचा धनादेश मदत म्हणून देण्यात आला.

याप्रसंगी झालेल्या शोक सभेत आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल न उचलण्याचे आवाहन देखील करण्यात आले. जळगाव विभागातील एसटी कामगार सेनेचे पदाधिकारी सॅट प्रमुख गोपाळ पाटील, विभागीय सचिव आर.के. पाटील, दिलीप सूर्यवंशी, आगार उपाध्यक्ष प्रवीण कुमावत आदींनी दिवंगत मनोज चौधरी यांच्या कुसुंबा येथील राहत्या घरी भेट देऊन कामगार सेनेच्यावतीने एक लाख रूपयांचा धनादेश दिला. रत्नागिरी आगारातील दिवंगत एसटी कर्मचारी पांडुरंग संभाजी गडदे यांच्या बीड-परळी निवासस्थानीही सांत्वनपर भेट देण्यात आली. त्याप्रसंगी विभागीय सचिव राहुल बहीर, किशोर जगदाळे, दयानंद गित्ते, मोहन गित्ते, आगाव, भरत ननवरे, आगार अध्यक्ष विष्णू सातभाई आदी उपस्थित होते.