वीज ग्राहकांच्या माथी दरवाढीचा बोजा, महावितरणच्या प्रतियुनिट दरात सवा रुपयाची वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Electric bill centres

गगनाला भिडलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असतानाच आता त्यांच्या माथी वीज दरवाढीचा बोजा पडणार आहे. कोळशासह इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याने इंधन समायोजन आकारात (एफएसी) वाढ करण्यास वीज आयोगाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यामुळे महावितरणकडून पुरवल्या जाणाऱया प्रतियुनिट विजेच्या दरात सरासरी 1 रुपया 19 पैशांची वाढ होणार आहे. अदानीकडून प्रतियुनिटमागे सरासरी 92 पैशांची वाढ होणार असून टाटा पॉवरचे वीज दरही वाढणार आहेत.

उन्हाळय़ात विजेची मागणी वाढलेली असतानाच कोळसाटंचाई निर्माण झाल्याने सर्वच वीजनिर्मिती कंपन्यांना जादा दराचा कोळसा वापरावा लागला आहे. त्याचा भार वीज वितरण कंपन्यांवर आला आहे. त्यामुळे त्याच्या वसुलीसाठी महावितरण, अदानी इलेक्ट्रिसिटी आणि टाटा पॉवरने इंधन समायोजन आकारात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सदरची वाढ जुलैच्या वीज बिलापासून पुढे पाच महिने लागणार आहे. त्यामुळे वीज ग्राहकांना मोठी झळ बसणार आहे.

अदानी इलेक्ट्रिसिटी उपनगरातील 30 लाख वीज ग्राहकांकडून पुढील पाच महिन्यांत 362 कोटी रुपये वसूल करणार आहे. त्यासाठी प्रतियुनिटमागे सरासरी 92 पैशांची वाढ करण्यात आली आहे. घरगुती ग्राहकांवर याचा सुमारे 25-35 पैसे एवढा भार पडणार आहे.

टाटा पॉवरच्या प्रतियुनिटच्या दरात 90 पैशांची वाढ

टाटा पॉवर इंधन समायोजनांतर्गत पाच महिन्यांत तब्बल 273 कोटी रुपये वसूल करणार आहे. त्यामुळे प्रतियुनिटमागे सरासरी 90 पैशांची वाढ होणार आहे. आठ लाख ग्राहकांवर हा भार पडणार आहे.

महावितरण पाच महिन्यांत सुमारे 6000 कोटी रुपये वसूल करणार

कोळसा आणि इंधन दरवाढीमुळे महावितरणला उन्हाळय़ात सुमारे 6000 हजार कोटी रुपये जादा मोजावे लागले आहेत. त्याच्या वसुलीसाठी महावितरणकडून सरासरी प्रतियुनिटमागे 1 रुपये 19 पैशांची वाढ केली जाणार आहे. घरगुती ग्राहकांसाठी 65 पैशांपासून 2 रुपये 35 पैशांपर्यंत वाढ होणार आहे, तर औद्योगिक आणि वाणिज्यिक ग्राहकांना यापेक्षा जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

ग्राहक गट   प्रतियुनिटमागे (युनिटमध्ये) वाढ
0-100                  65 पैसे
101- 300          1.40 रुपये
301-500           2.05 रुपये
500 पेक्षा जास्त     2.35 रुपये