
कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या लसीकरणात शनिवारी 4 लाख 62 हजार 735 नागरिकांचे लसीकरण करून महाराष्ट्राने राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यंत्रणेचे अभिनंदन केले. गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांना मागे टाकीत सुमारे 73 लाख 47 हजार 429 जणांचे लसीकरण करून महाराष्ट्र आतापर्यंत देशात अग्रभागी राहिला आहे.
महाराष्ट्र कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात पहिल्यापासूनच अग्रेसर राहिला आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाला वेग देण्यासाठी सध्या होत असलेल्या लसीकरणाच्या दुप्पट संख्येने लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यात 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील व्यक्तींची लसीकरणाला सुरुवात झाली. त्या दिवशी 3 लाखांहून अधिक जणांना लस देऊन राज्याने उच्चांक गाठला होता, तर शनिवारी 4102 लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून 4 लाख 62 हजार जणांना लस देण्यात आली.
अशाच पद्धतीने लसीकरणाचा वेग ठेवल्यास लवकरच राज्यात दिवसाला सहा लाखांहून अधिक जणांना लस देण्याचे उद्दिष्ट गाठता येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पुणे जिह्याने राज्यात सर्वाधिक 76 हजार 594 जणांना लसीकरण करून राज्यात अग्रस्थान कायम राखले आहे. त्यापाठोपाठ मुंबई उपनगर (46 हजार 937), नागपूर (41 हजार 556), ठाणे (33 हजार 490) या जिह्यांनी लसीकरणात आघाडी घेतली आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले.
































































