सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अत्यंत अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक आणि काँग्रेसचे महेंद्र लाड अशा तिघांजणांची बिनविरोध निवड झाली.उर्वरित 18 जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये लढत होत आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक येत्या 21 तारखेला होत आहे. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोसायटी गटातून विटा तालुक्यातून शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, शिराळा तालुक्यातून राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक आणि पलूस तालुक्यातून काँग्रेसचे महेंद्र लाड हे तिघेजण बिनविरोध निवडून आले. उर्वरित 18 जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये अनेक दिग्गज निवडणुकीला सामोरे जात आहेत. विशेष म्हणजे भाजपाचे खासदार संजय पाटील यांनी दोन्ही गटातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे जिल्हा बँकेत जाण्याचा त्यांचा मार्ग थांबला असला तरी भविष्यात स्वीकृत संचालक म्हणून त्यांची निवड होण्याचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम ,शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी एकत्रित येत जिल्हा बँक ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यांच्या या प्रयत्नाला तीन संचालकांची बिनविरोध निवड झाल्याने बळ मिळाले आहे. महाविकास आघाडी विरोधात भाजपाने दंड थोपटले असले तरी भाजपाचे खासदार संजय काका पाटील यांनी आपले सर्व अर्ज मागे घेतल्याने भाजप गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.





























































