प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते व महेश बाबूचे वडील कृष्णा यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध तेलुगु अभिनेते व प्रसिद्ध अभिनेता महेश बाबूचे वडिल कृष्णा यांचे आज हैद्राबाद येथील रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते 80 वर्षांचे होते. दोन महिन्यांपूर्वीच महेश बाबूची आई इंदिरा देवी यांचे निधन झाले होते.

महेश बाबू याच्या वडिलांना सोमवारी प्रकृती अस्वास्थामुळे हैद्राबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कृष्णा यांचं खरं नाव घट्टेमानेनी सिवा रामा कृष्णा मूर्ती होते. त्यांनी 350 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्यांच्या काळचे ते आघाडीचे अभिनेते होते. अभिनयानंतर दिग्दर्शक व निर्माते म्हणून देखील त्यांची यशस्वी कारकिर्द राहिली आहे. 2009 साली त्यांना केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

कृष्णा यांनी 80 च्या दशकात काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर त्यांनी राजकारणाला कायमचा रामराम ठोकला.