मालगाडय़ांचा अडथळा दूर होणार, दोन्ही डीएफसी मार्ग डिसेंबर 2021 पर्यंत बांधून पूर्ण होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशच्या दादरी ते मुंबई हा वेस्टर्न डेडीकेटेड प्रेट कॉरीडॉर (डीएफसी) मालगाडी रेल्वे वाहतूक मार्ग आणि लुधियाना ते कोलकाता जवळील दानकुनी हा ईस्टर्न डीएफसी मार्ग या दोन्ही मालगाडी वाहतूक मार्गिका डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होणार आहेत. त्यामुळे लांबपल्ल्यांच्या मेल-एक्सप्रेस मार्गावरून होणारी 70 टक्के मालगाडय़ांची वाहतूक या दोन्ही डीएफसी मालगाडी मार्गांवरून कळविली जाणार आहे. त्यामुळे लांबपल्ल्यांच्या मेल-एक्सप्रेसची संख्या वाढविणे रेल्वेला लवकरच शक्य होणार आहे.

पश्चिम आणि पूर्व डीएससी कॉरीडॉर एकदाचे पूर्ण झाल्यास मुंबई आणि दिल्ली तसेच दिल्ली आणि हावडा या दोन राज्यांतील सर्वाधिक वर्दळीच्या रेल्वे मार्गावरील प्रवासाचा वेळ प्रवासी गाडय़ा आणि मालगाडी अशा दोन्हीसाठी मोठय़ा प्रमाणात कमी होणार आहे. 1,500 कि.मी.चा पश्चिम डीएफसी मालगाडी मार्ग दिल्लीच्या दादरी पासून मुंबई जेएनपीटीपर्यंत आहे. तर पूर्व डीएफसी मालगाडी मार्ग पंजाबच्या लुधियाना ते पश्चिम बंगालच्या दानकुनी पर्यंत असा 1,800 कि.मी. आहे. 2010 साली या मार्गाला मंजूरी मिळाली होती. परंतू जमिन संपादन, पर्यावरणीय मंजूरी आणि आर्थिक मंदी यामुळे काम रखडले.  

जपान आणि वर्ल्ड बँकेच्या सहकार्याने काम

पश्चिम डीएफसी कॉरीडॉरसाठी जापनीझ इंटरनॅशनल कॉर्पेरेशन एजन्सीने 33 हजार कोटींचे कर्ज दिले आहे. तर पूर्व डीएफसी कॉरीडॉर काही प्रमाणात वर्ल्ड बँकेच्या कर्जावर बांधला जात आहे. एकदा का हा मालगाडी मार्ग तयार झाला तर सध्या होत असलेली 1200 दशलक्ष टन मालवाहतूक 2,300 दशलक्ष टनापर्यंत वाढविता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे मालवाहतूकीचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.