
पहाटेपासून पडत असलेला धुवांधार अवकाळी पाऊस आणि मोऱयांचे अपूर्ण राहिलेले काम, यामुळे महाड शहरातून किल्ले रायगडकडे जाणाऱया मार्गाला काsंझर गावाच्या परिसरात आज मोठे भगदाड पडले. या भगदाडाची माहिती जिल्हा प्रशासन आणि पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी हा मार्ग तातडीने बंद केला. त्यामुळे किल्ले रायगड परिसरातील सर्वच गावांचा संपर्क तुटला आहे.
रायगड जिह्यात अवकाळी पावसाचा जोर आज मोठय़ा प्रमाणात वाढला. त्याचा सर्वाधिक फटका महाड-किल्ले रायगड मार्गाला बसला. शिवराज्याभिषेक सोहळा जवळ आल्यामुळे या मार्गाची सध्या डागडुजी सुरू आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने अनेक ठिकाणी मार्गावर मोठमोठे खड्डे पडले. कोझर गावच्या परिसरात ज्या ठिकाणी मोठमोठे धबधबे निर्माण होतात त्या ठिकाणी मोरींचे काम करणे आवश्यक होते. मात्र मोरींचे काम अपूर्ण राहिल्याने याच ठिकाणी रस्त्यावर मोठे भगदाड पडले. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक शंकर काळे यांनी सांगितले.



























































